टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-बोराळे-सिद्धापूर-कुसुर-विंचूर या राज्य मार्गाच्या रखडलेल्या कामावरून आणि रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांवरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे.

प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणाचा निषेध करण्यासाठी ‘शिवसेना (शिंदे गट)’ कमालीची आक्रमक झाली आहे.
काल शिवसैनिकांनी थेट रस्त्यावरील खड्ड्यांतील दगड-गोट्यांची माळ गळ्यात घालून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आणि प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला.

१४ कोटी मंजूर, पण काम मात्र १०% देखील नाही
सन २०२३-२०२४ मध्ये या राज्य मार्गाच्या कामासाठी तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या भागात सुमारे ३५ ते ४० हजार नागरिक राहतात. यांची कामा निमित्त ये-जा सुरु असते.

मात्र, मंजुरी मिळून एवढा काळ लोटला तरी अद्याप १० टक्केही काम पूर्ण झालेले नाही. दोन ते तीन महिन्यांपासून या रस्त्याचे काम पूर्णपणे ठप्प आहे. ठेकेदाराने रस्त्यातील खड्डे न बुजवताच केवळ रुंदीकरण करून काम अर्धवट सोडून दिले आहे, ज्यामुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे.

या भागातील शालेय विद्यार्थी, शेतकरी, चाकरमानी आणि रुग्णांना या खराब रस्त्यामुळे मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. यापूर्वी उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही.

उलट, संबंधित अधिकारी ठेकेदाराला धारेवर धरण्याऐवजी त्याची पाठराखण करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे.
”अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला काम सुरू करण्याचे कोणतेही कडक पत्र दिले नाही. फक्त ‘अपघात झाल्यास ठेकेदार जबाबदार राहील’ असे पत्रक काढून प्रशासनाने स्वतःचे हात वर केले आहेत. हा जनतेच्या जिवाशी खेळ आहे,” असा संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला.

८ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा उग्र आंदोलन
”शिवसेना आता जनतेचा हा छळ अजिबात सहन करणार नाही,” असा इशारा देत शिवसैनिकांनी आज अनोखे ‘दगड-धोंड्यांचे’ आंदोलन केले. पुढील ८ दिवसांत जर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे उग्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.

या आक्रमक आंदोलनात शिवसेनेचे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजू सावंत, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर गरंडे, विभाग प्रमुख गुंडाप्पा पाटील, सागर चौगुले, प्रसाद कसबे, अशोक सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













