मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
एकीकडे पाण्यासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला असताना आणि नदीकाठची गावे पाण्यासाठी टाहो फोडत असताना, दुसरीकडे मंगळवेढा तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या कोरड्या पात्रात वाळूमाफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे.

कायद्याची कोणतीही चाड न बाळगता नदीपात्रात थेट जेसीबी उतरवून रस्ते तयार केले जात असून, रात्रीच्या अंधारात डंपर आणि टिप्परचे तांडे लावून कोट्यवधींच्या ‘काळ्या सोन्या’ची महालूट केली जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हे संपूर्ण रॅकेट संबंधित तलाठी आणि महसूल यंत्रणेला हाताशी धरून बिनदिक्कत सुरू असल्याचा संतापजनक आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

दिवसा शांतता, रात्री थेट दरोडा! कसा चालतोय हा खेळ?
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाळूचोरीचे जाळे एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखे ‘सिस्टीम’ लावून चालवले जात आहे. दिवसा तालुक्यातील पेट्रोल पंपांवर आणि मोकळ्या जागांवर टिप्पर व डंपर शांतपणे उभे केले जातात. रात्री अंधार दाटताच वाळू तस्करांचा फोन खणखणतो आणि ठरलेल्या नंबरनुसार एकापाठोपाठ एक गाड्या नदीपात्रात घुसतात.

अवघ्या काही मिनिटांत जेसीबीच्या साहाय्याने टिप्पर भरून भरधाव वेगाने पळवले जातात. भीमेच्या छातीवर खुलेआम चालणाऱ्या या दरोड्यामुळे नदीत मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून, भूजल पातळी रसातळाला गेली आहे.

”हे आमचं काम नाही!” तलाठ्यांचा महसूल-लिलाव
स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी या बेकायदेशीर उपशाविरोधात तक्रार केली असता, जबाबदार तलाठ्यांकडून “वाळू पकडणे हे आमचे काम नाही, ते पोलिसांचे काम आहे,” अशी मुजोरीची उत्तरे देऊन जनतेला हाकलून लावले जात आहे.

स्वतःच्या कार्यक्षेत्रात नदीची खुलेआम लूट होत असताना महसूल यंत्रणेने घातलेली ही ‘डोळ्यांवरची पट्टी’ केवळ दुर्लक्ष नसून, दरमहा पोहोचणाऱ्या ‘मंथली पाकिटां’चाच हा प्रताप असल्याचा उघड संशय आता व्यक्त होत आहे.
नदीकाठच्या गावांचा एकच सवाल : जिल्हाधिकारी गय करणार का?
वाळू उपशामुळे नदीचे नैसर्गिक प्रवाह उद्ध्वस्त झाले असून भविष्यात पाणीच जमिनीत जिरणार नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्रात साचलेले अवाढव्य ढिगारे आणि खोल खड्डेच या भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे ओरडून सांगत आहेत.
प्रशासनाला अंधारात ठेवून भीमेचे लचके तोडणाऱ्या या वाळूमाफियांवर आणि त्यांना मूक संमती देणाऱ्या कामचुकार तलाठ्यांवर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पथके पाठवून धाडी टाकाव्यात, पंचनामे करून संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी तीव्र मागणी आता मंगळवेढ्यातील नदीकाठच्या संतप्त जनतेतून केली जात आहे. अन्यथा महसूल कार्यालयावर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













