टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
तालुक्यातील उचेठाण येथे जमिनीचा जुना वाद आणि परस्पर ऊसतोडीच्या वादातून एका शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या झटापटीत संबंधित शेतकरी महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते शरद कोळी यांचे बंधू भारत विठ्ठल कोळी, माणिक कोळी आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयात दावा असतानाही जमिनीवर ताबा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व तिचे कुटुंबीय उचेठाण येथील रहिवासी आहेत. उचेठाण शिवारातील गट क्र. १५२/३ मधील ७ एकर जमिनीवरून उभय पक्षांमध्ये तीव्र वाद असून, हे प्रकरण सध्या मंगळवेढा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित असतानाही या जमिनीवर शरद कोळी यांनी बेकायदेशीर ताबा मिळवून शेती सुरू केल्याचा आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

चर्चेच्या बहाण्याने बोलावले अन् हल्ला केला!
२१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास संबंधित संशयितांनी न्यायालयातील वाद सामोपचाराने मिटवून जमीन परत करण्याच्या बहाण्याने पीडित साखरे दाम्पत्याला चर्चेसाठी बोलावले होते.

चर्चा संपवून हे दाम्पत्य घरी परतत असताना दबा धरून बसलेल्या भारत कोळी आणि माणिक कोळी यांनी महिलेच्या पतीवर अचानक हल्ला चढवत बेदम मारहाण सुरू केली. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या जितेंद्र साखरे यांनाही संशयितांनी धक्काबुक्की व मारहाण केली.
महिलेशी झोंबाझोंबी करत विनयभंग
पतीला वाचवण्यासाठी पीडित महिला पुढे धावली असता, संशयित आरोपी भारत कोळी यांनी तिच्याशी अत्यंत लज्जास्पद वर्तन करत झोंबाझोंबी केली. यावेळी महिलेचा ब्लाऊज फाडून तिचा विनयभंग करण्यात आला आणि तक्रार केल्यास जीवे मारण्याची उघड धमकी देण्यात आली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हल्ल्यानंतर जखमी दाम्पत्याने तातडीने मंगळवेढा पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलिसांनी जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून प्राथमिक उपचार केले.
याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि विनयभंगासह विविध कलमान्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत आहेत. एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या भावावर थेट विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












