टीम मंगळवेढा टाईम्स :
गावागावांत लाखो रुपयांचा निधी खर्चून उभारलेले ‘सभा मंडप’ नेमके कोणाच्या उपयोगाचे? असा संतप्त सवाल आता मंगळवेढा तालुक्यातील सजग नागरिक आणि तरुण वर्गातून उपस्थित केला जात आहे. अनेक गावांत हे सभा मंडप सार्वजनिक वापराऐवजी दिवसभर भटकी कुत्री आणि मद्यपींचा अड्डा बनल्याचे विदारक चित्र दिसत आहे. त्यामुळे यापुढे नेत्यांकडे निव्वळ दिखाऊ सभा मंडपांसाठी हात पसरण्याऐवजी गावाच्या अस्तित्वासाठी गावातील रस्ते, पाण्याचे बंधारे, मुलांच्या भवितव्यासाठी शाळांची दुरुस्ती आणि तरुणाईसाठी व्यायामशाळा (जिम) उभारण्यासाठी निधी मागावा, असा नवा विचार तालुक्यात जोर धरू लागला आहे.

लाखो रुपयांचा चुराडा; सभा मंडप की मद्यपींचा अड्डा?
शासकीय योजनांतून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून प्रत्येक गावात समाज मंदिर अथवा सभा मंडपासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या वास्तूंची देखभाल कोणीही करत नाही.

बहुतांश ठिकाणी उद्घाटनानंतर हे मंडप केवळ निवडणुका किंवा क्वचित होणाऱ्या बैठकांपुरतेच मर्यादित राहतात. उर्वरित दिवसांत येथे भटकी जनावरे ठाण मांडतात किंवा रात्रीच्या वेळी मद्यपी आणि समाजकंटक वावरताना दिसतात. ज्या उद्देशाने जनतेच्या कराचा पैसा खर्च झाला, तो उद्देशच धुळीस मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता; पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवणे गरजेचे
सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद झाले आहे. विहिरी आणि बोअरवेल आटू लागल्या असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

अशा गंभीर परिस्थितीत केवळ शोभेच्या इमारती उभारण्यापेक्षा गावातील ओढे, नाले यांवर सिमेंट बंधारे बांधणे, अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे आणि पाणी अडवणे याला सर्वोच्च प्राधान्य देणे काळाची गरज बनली आहे. बंधाऱ्यांमुळे भूजल पातळी वाढून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकतो.

तरुणाईचा रोख : ‘आमच्या हाताला बळ आणि डोक्याला शिक्षण द्या!
गावातील जिल्हा परिषद शाळांच्या मोडकळीस आलेल्या खोल्या, गळणारी छपरे आणि डिजिटल शिक्षणाचा अभाव याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सभा मंडपाचा निधी जर शाळांच्या डागडुजीसाठी, स्वच्छतागृहांसाठी आणि शैक्षणिक सुविधांसाठी वळवला, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुधारेल. याचबरोबर, व्यसनाधीनतेपासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी गावात सुसज्ज व्यायामशाळा (ओपन/इनडोअर जिम) आणि क्रीडांगणे उभारण्याची मागणीही तरुण वर्गातून होत आहे.

ग्रामस्थांचा सूर :
“गावात पाणी नसेल तर गावं जगणार कशी? आणि शाळाच नीट नसतील तर मुले शिकणार कशी? आता नेत्यांनी गावकऱ्यांना भुलवण्यासाठी सभा मंडपाचे गाजर दाखवणे बंद करावे. आम्हाला पाणी अडवणारे बंधारे आणि शिक्षणासाठी सक्षम शाळा हव्यात. ग्रामसभेत आता याच कामांचे ठराव मंजूर केले जातील.”
दिखाऊ कामांपेक्षा मूलभूत गरजांना प्राधान्य द्या!’ — कचरेवाडीचे माजी सरपंच दादासाहेब जाधव यांचे आवाहन
“केवळ नावापुरते उभे राहणारे सभा मंडप गावाचे भविष्य घडवू शकत नाहीत. आज खऱ्या अर्थाने गावाला दर्जेदार रस्त्यांची, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची, तसेच भावी पिढी घडवणाऱ्या शाळांची आणि तरुणाईच्या आरोग्यासाठी सुसज्ज व्यायामशाळांची नितांत गरज आहे. त्यामुळे शासनाने दिशाभूल करणाऱ्या सभा मंडपांऐवजी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे,” असे परखड व दिशादर्शक मत कचरेवाडी गावचे माजी सरपंच दादासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. गावातील तरुण आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा ओळखून विकासनिधीचा योग्य विनियोग व्हावा, यावर त्यांनी यावेळी ठामपणे भर दिला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









