टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी दक्षिण भागासाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. कृष्णा-कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यातून मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांना तसेच चार मोठ्या साठवण तलावांना थेट बंदिस्त पाईपलाईनद्वारे (नलिकेद्वारे) पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या अथक आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर २६ ऑक्टोबर रोजी या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला.

१७० कोटींचा खर्च; ४६ किमी लांबीची मुख्य पाईपलाईन
प्रकल्पाच्या आराखड्यानुसार, जत मुख्य कालव्याच्या किमी ७२ मधून १८०० मिमी व्यासाच्या भव्य बंदिस्त नलिकेद्वारे हे पाणी थेट उचलले जाईल. मंगळवेढा वितरिका क्र. १ व २ तसेच उमदी वितरिकेवरील लघुवितरिका आणि चारही तलावांपर्यंत पोहोचण्यासाठी ४६ किलोमीटर लांबीची बंदिस्त नलिका टाकण्यात येणार असून यासाठी एकूण १७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या कामाचा समावेश कृष्णा-कोयना प्रकल्पाच्या प्रस्तावित ६ व्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) अहवालात करण्यात आला आहे. राज्य तांत्रिक सल्लागार समितीची (SLTAC) मंजुरी मिळताच सविस्तर तांत्रिक मान्यता घेऊन लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल.

या ४ प्रमुख साठवण तलावांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार
थेट बंदिस्त पाईपलाईनमुळे खालील चार प्रमुख साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जाणार आहेत:

शिरनांदगी तलाव, मारोळी तलाव, लवंगी तलाव,पडोळकरवाडी तलाव
तलाव तुडुंब भरल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल, परिसरातील विहिरी-बोअरवेल यांना जीवनदान मिळेल आणि पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल.

कमी दाब आणि खंडित पाण्याचा त्रास कायमचा संपणार!
आतापर्यंत जत मुख्य कालव्यातून मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला अत्यंत कमी दाबाने आणि वारंवार खंडित स्वरूपात पाणी मिळत होते. मात्र आता थेट बंदिस्त नलिकेचा वापर होणार असल्याने: पाण्याची गळती आणि बाष्पीभवन पूर्णपणे थांबेल. टेल-एंडच्या भागापर्यंत पाणी अखंडित आणि पूर्ण दाबाने पोहोचेल.दक्षिण भागातील १९ गावांना शेतीसाठी हक्काचे पाणी वेळेवर उपलब्ध होईल.
लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल
”मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतकरी व नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विशेष सहकार्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल.”— आ. समाधान आवताडे, आमदार, मंगळवेढा-पंढरपूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















