टीम मंगळवेढा टाईम्स ।
शासकिय स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या मासिक चलनाचा भरणा करण्याकरीता 1200 रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी पुरवठा निरिक्षक उत्तम वामन गायकवाड (वय 39),खाजगी इसम बालाजी सिध्देश्वर यादव(वय 25,मारापूर) या दोघांना लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता त्या दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.
या घटनेची हकिकत अशी,मंगळवेढा पुरवठा विभागात आरोपी उत्तम गायकवाड हे पुरवठा निरिक्षक असून खाजगी इसम तथा आरोपी बालाजी यादव हा संगणक ऑपरेटर आहे.
दि.12 मे रोजी 1.33 व दि.26 रोजी 1.49 वाजता फिर्यादी हा शनिवार पेठेतील स्वस्त धान्य दुकानदार असून आरोपी यादव याने चलनाच्या रकमेव्यतिरिक्त साहेबांना मासिक हप्ता म्हणून 1200 रुपये दयावे लागतील.
असे म्हणून दि.26 रोजी 5.50 वाजता 1200 रुपयांची लाच स्विकारताना शासकिय धान्य गोदामात लाच लुचपत पथकाने रंगेहाथ पकडून दि.27 च्या पहाटे 4.00 वा. वरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासिक अंमलदार उमेश महाडिक यांनी आरोपींना अटक करून पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान,लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे तहसील कार्यालयात शुक्रवारी शुकशुकाट होता. अधिकार्यांच्या खुर्च्याही काम घेवून येणार्या नागरिकांना रिकाम्या दिसत असल्यामुळे त्याबाबत उलट सुलट चर्चेला दिवसभर उधाण आले होते.
मंगळवेढा तालुक्यात 105 स्वस्त धान्य दुकाने असून हा लाचेचा प्रकार पारंपारिक असल्याची चर्चा तहसील कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदारांमधून सुरू होती.महिन्याकाठी जवळपास दीड लाखाचे कलेक्शन होत असल्याचाही सूर स्वस्त धान्य दुकानदारामधून या कारवाईमुळे निघत होता.
ही रक्कम कोणाकोणाकडे जात होती याचा तपास मूळाशी जावून होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
यातील खाजगी इसम हा यापुर्वी रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचे काम करत असतानाही त्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकार्यांकडे नागरिकांनी केल्या होत्या.
यावर वरिष्ठांनी त्याला पुन्हा शासकिय गोडावूनकडे रिचार्ज केल्यानेच लाचेसारख्या भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असून याला सर्वस्वी वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज