टीम मंगळवेढा टाइम्स । (विशेष प्रतिनिधी):
मंगळवेढ्यात भल्या पहाटे फिरायला जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवेढा-पंढरपूर रोडावरील बायपास परिसरात मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या एका ७१ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील १ लाख १५ हजार ७५१ रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात दुचाकीस्वाराने जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे मंगळवेढ्यातील महिला वर्गात तीव्र घबराट पसरली आहे.

काळ्या दुचाकीवरून आला अन् काही सेकंदात लांबवले दागिने
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला रायबान (वय ७१, रा. मंगलनगर, मंगळवेढा) या ६ ऑगस्ट रोजी सकाळी मंगळवेढा-पंढरपूर रोडावरील बायपास परिसरात नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या.

व्यायाम आटोपून पायी घरी परतत असताना, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आणि हाफ शर्ट घातलेला एक अज्ञात चोरटा त्यांच्यासमोर आला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता शकुंतला यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण ओरबडून घेतले अन् भरधाव वेगाने पसार झाला.

या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे तपास करत आहेत.
महिन्याभरात दुसरी घटना; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी याच बायपास रोडवर जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सुषमा सुतार या सकाळी व्यायाम करत असताना त्यांना दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी “आम्ही पोलीस आहोत” अशी बतावणी करून त्यांचे दागिने काढून घेतले होते. त्या घटनेचा तपास अजून लागलेला नसतानाच आज पुन्हा तीच पुनरावृत्ती झाली आहे.

पोलिस पुढे अन् चोरटे मागे:
काही दिवसांपूर्वी शनिवार पेठेत चक्क पोलीस गस्त घालत असताना चोरट्यांनी एटीएम फोडून रोख रक्कम लुटली होती. चित्रपटासारखा थरार घडत असतानाही चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.

नागरिकांत तीव्र संताप: शहरासह ग्रामीण भागात घरफोड्या आणि जबरी चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जुन्या एकाही चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
तपास यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने मंगळवेढ्यासाठी आता सक्षम आणि धडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची नितांत गरज असल्याच्या प्रतिक्रिया सुजाण नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












