टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी) :
यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या डान्स स्पर्धेचा आनंद लुटत असताना, समोर उभे राहून अडथळा निर्माण करणाऱ्यांना ‘जरा बाजूला उभे राहा, समोरचे दिसत नाही’ असे सांगणे एका ३० वर्षीय तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे.

या क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या चौघांनी तरुणाची गच्ची पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात लोखंडी गज घातल्याची धक्कादायक घटना मुंढेवाडी (ता. मंगळवेढा) येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढेवाडी येथील लक्ष्मीदेवी मंदिरासमोर यात्रेनिमित्त दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील बाबासाहेब ठेंगील (वय ३०) हे ही स्पर्धा पाहण्यासाठी गेले होते. कार्यक्रम रंगात आला असताना गावातीलच विजय ठेंगील व दिनेश ठेंगील हे बाबासाहेब यांच्या समोर येऊन उभे राहिले.

वादाचे रूपांतर रक्तरंजित हाणामारीत
समोरचे दृश्य दिसत नसल्याने बाबासाहेब यांनी त्यांना बाजूला उभे राहण्याची विनंती केली. मात्र, या साध्या बोलण्याचा राग धरून विजय ठेंगील, दिनेश ठेंगील, माणिक ठेंगील आणि अरूण ठेंगील या चौघांनी संगनमत करून बाबासाहेब यांची गच्ची पकडली आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या विजय ठेंगील याने जवळच असलेला लोखंडी गज उचलून थेट बाबासाहेब यांच्या डोक्यात प्रहार केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले.

मध्यस्थी करणाऱ्यांनाही धक्काबुक्की
हा प्रकार सुरू असतानाच बाबासाहेब यांची चुलती प्रियांका ठेंगील आणि आकाश घोडके यांनी तातडीने धाव घेत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांनाही जुमानले नाही आणि धक्काबुक्की करत खाली ढकलून दिले.
या घटनेनंतर जखमी बाबासाहेब ठेंगील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी विजय ठेंगील, दिनेश ठेंगील, माणिक ठेंगील आणि अरूण ठेंगील या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे यात्रेच्या वातावरणात तणाव निर्माण झाला असून, मंगळवेढा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












