टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी) :
राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. जिल्ह्यातील १ हजार २७ पैकी तब्बल ७०२ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्येच संपली आहे. मात्र, सध्या राज्यातील ३०४ तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, याच धर्तीवर आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही पुढच्या पावसाळ्यानंतरच म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर २०२७ या कालावधीत (पुढच्या दिवाळीत) होतील, अशी माहिती विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

निवडणुका लांबणीवर पडण्याची प्रमुख कारणे:
दुष्काळ निवारणावर भर : उन्हाळा आणि पावसाळ्यात सहसा निवडणुका घेतल्या जात नाहीत. सध्या प्रशासन दुष्काळ निवारण आणि जनावरांच्या चाऱ्याच्या नियोजनात व्यस्त आहे.

प्रशासकीय राजवट : मुदत संपलेल्या ७०२ ग्रामपंचायतींवर सुरुवातीला सहा महिने विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र, ऑगस्टपासून विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा एकूण २७८ अधिकाऱ्यांकडे या ग्रामपंचायतींचा कारभार सोपवण्यात आला असून, निवडणुका होईपर्यंत तेच कारभार पाहणार आहेत.

मतदारयादी आणि प्रक्रियेची सद्यस्थिती:
सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य आरक्षण जाहीर झाले असून प्रभागरचनाही निश्चित झाली आहे. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होत असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा कार्यक्रम थांबला होता. ‘एसआयआर’नंतर येत्या ३० नोव्हेंबरला मतदारयादी अंतिम होणार आहे.

जेव्हा निवडणुका जाहीर होतील, तेव्हा प्रारूप मतदारयादीवरील हरकती व आक्षेप घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
इच्छुकांना आणखी १० महिने प्रतीक्षा!
निवडणुका लांबणीवर पडल्याने गावगाड्यातील राजकारण सध्या थंडावले आहे. ११, १३ आणि १५ सदस्य संख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक उमेदवारांना आता निवडणुकीसाठी आणखी किमान १० महिने वाट पाहावी लागणार असून, तोपर्यंत कार्यकर्त्यांची फळी सांभाळण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
“मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सुरुवातीला सहा महिने विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून नेमले होते. पण, आता निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमले आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातील ७०२ ग्रामपंचायती आहेत. त्यावरील प्रशासकांना सर्व आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत. सध्या दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा आणि दुष्काळ निवारणावर विशेष भर दिला जात आहे.”— सूर्यकांत भुजबळ (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












