टीम मंगळवेढा टाईम्स : विशेष प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंगळवेढा आणि करमाळा तालुक्यातील राजकारणाचे एक अनोखे समीकरण पाहायला मिळाले आहे. आवताडे गटाचे सिद्धेश्वर आवताडे आणि जगताप गटाचे शंभूराजे जगताप हे सख्खे ‘साडू भाऊ’ जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात एकाच वेळी बिनविरोध निवडून आले आहेत.

या निवडीनंतर दोन्ही तालुक्यांत या अनोख्या नात्याची आणि सहकारातील त्यांच्या कुटुंबांच्या वर्चस्वाची जोरदार चर्चा रंगली आहे.

मंगळवेढ्याच्या सहकारावर बबनराव आवताडे यांचीच पकड
गेल्या ३५ वर्षांपासून मंगळवेढा तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर एकहाती वर्चस्व ठेवणाऱ्या ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे यांची विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीमुळे मंगळवेढ्याच्या राजकारणात आवताडे कुटुंबाचा दबदबा कायम राहिला आहे. सिद्धेश्वर यांच्या मातोश्री सुनंदा आवताडे या मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असून, आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून सत्तेचे आणखी एक महत्त्वाचे केंद्र आवताडे गटाकडे आले आहे.

कमी वयात सहकाराचा दांडगा अनुभव
सिद्धेश्वर आवताडे यांना अत्यंत कमी वयात सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव आहे:
खरेदी-विक्री संघ: गेल्या १५ वर्षांपासून चेअरमन म्हणून यशस्वी धुरा सांभाळत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती: गेल्या १० वर्षांपासून संचालक म्हणून कार्यरत आहेत.
दामाजी साखर कारखाना: श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे ते विद्यमान संचालक आहेत.

दोन दिग्गज घराण्यांची नवी पिढी एकत्र
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आवताडे आणि जगताप या दोन्ही घराण्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. शंभूराजे जगताप हे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र आहेत. ते करमाळा बाजार समितीचे संचालक असून अनेक शिक्षण संस्थांचा कारभार यशस्वीपणे पाहत आहेत.
विशेष म्हणजे, सिद्धेश्वर आवताडे आणि शंभूराजे जगताप या दोघांचीही सासुरवाडी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील आहे. आता या दोन्ही साडू भावांची जोडी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवते आणि जिल्ह्याच्या सहकाराला कोणती नवी दिशा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










