मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील सब जेलमधून भरदुपारी तीन पोलिसांच्या कड्या पहऱ्यातून डोळ्यात धूळ फेकून फरार झालेल्या कर्नाटकच्या अट्टल आरोपीला पकडण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत थेट कर्नाटक गाठले आणि आरोपीला पुन्हा बेड्या ठोकल्या. सध्या पोलीस पथक आरोपीला घेऊन मंगळवेढ्याकडे रवाना झाले असून, पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचे कौतुक होत आहे.

भरदुपारी घडला होता थरार
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा कर्नाटक राज्यातील रहिवासी असून तो मंगळवेढा सब जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता.

दरम्यान, दुपारच्या सुमारास जेलच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तब्बल तीन गार्ड पोलिसांच्या नजरेतून सुटून या आरोपीने अत्यंत हुशारीने पलायन केले. भरदुपारी घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

’नजरेतून कसा सुटला?’ हा तपासाचा विषय
एकाच वेळी तीन-तीन पोलीस गार्ड ड्युटीवर असताना, आरोपी त्यांच्या हातावर तुरी देऊन कसा काय पळाला? हा सध्या मंगळवेढ्यात प्रचंड चर्चेचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, मंगळवेढा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद करून आपल्या खाकीची अब्रू राखली आहे.

अशी झाली ‘फिल्मी स्टाईल’ अटक
आरोपी पळाल्याची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. आरोपी आपल्या मूळ गावी किंवा कर्नाटकात पळून जाण्याची शक्यता गृहीत धरून तातडीने एक विशेष पथक कर्नाटककडे रवाना करण्यात आले होते.

आधुनिक तंत्रज्ञान आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पुन्हा पळण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्याला घेराव घालून ताब्यात घेतले.
मंगळवेढ्याकडे पोलिसांची रवानगी
आरोपीला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे. कर्नाटक येथे कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून पोलीस पथक आरोपीसह मंगळवेढ्याकडे येण्यास निघाले आहे. आरोपी मंगळवेढ्यात पोहोचल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जाणार असून, त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली होती का? याचाही तपास केला जाणार आहे.

या धडक कारवाईमुळे मंगळवेढा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असले, तरी जेल सुरक्षेतील त्रुटींवर आता वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









