टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी)
कॉलेज परिसरामध्ये आणि बसस्थानकात तरुणींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना मंगळवेढा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. श्री संत दामाजी महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल आणि बसस्थानक परिसरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्या १३ ‘रोड रोमिओं’वर कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले,
तर ८ दुचाकीस्वारांना चांगलाच आर्थिक दंड ठोठावण्यात आला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

तक्रार मिळताच पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’
कॉलेज सुटल्यानंतर तरुणींना त्रास देणाऱ्या रोड रोमिओंबाबत काही सुज्ञ नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत डी.वाय.एस.पी. डॉ. बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने तात्काळ कारवाईची चक्रे फिरवली.

निर्भया पथक प्रमुख डॉ.आरती कणिरे, महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार प्रवीण जाधव यांच्या पथकाने कॉलेज परिसरात सापळा रचला.
विनाकारण चकरा मारणाऱ्या आणि संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणांना चाणाक्षपणे ओळखून ताब्यात घेतले.

मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई
ओळखपत्राची मागणी: निर्भया पथकाने कॉलेज परिसरात फिरणाऱ्या तरुणांकडे ओळखपत्राची (ID Card) मागणी केली असता, ते दाखवण्यात अपयशी ठरले.
कारवाईचा बडगा: ताब्यात घेतलेल्या १३ टवाळखोरांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम ११० व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन: कॉलेज परिसरात गाड्यांच्या विनाकारण फेऱ्या मारणाऱ्या ८ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

”अन्याय सहन करू नका!” — डॉ. आरती कणिरे यांचे आवाहन
कारवाईनंतर निर्भया पथक प्रमुख डॉ. आरती कणिरे यांनी महाविद्यालय प्रशासनाशी आणि विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. त्यांनी खालील महत्त्वाच्या सूचना दिल्या:

“कोणीही छेडछाड करत असल्यास किंवा त्रास देत असल्यास शांत बसू नका. कॉलेजमधील तक्रार पेटीत तुमची तक्रार टाका किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा. मुलींनी कोणताही अन्याय सहन करू नये.”
कॉलेज प्रशासनासाठी सूचना:
सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश आणि ओळखपत्र (ID Card) परिधान करणे बंधनकारक करावे, जेणेकरून बाहेरील मुले लगेच ओळखता येतील.
मुला-मुलींसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. आवारात संशयित किंवा मोकाट मुले आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
नागरिकांनी आणि पालकांनी मंगळवेढा पोलीस आणि निर्भया पथकाच्या या धडक कामगिरीचे जोरदार स्वागत केले असून, अशा कारवाया नियमित सुरू ठेवाव्यात अशी मागणी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














