टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीची लेखी परीक्षा ही यंदा मे महिन्यात होणार आहे.
त्या अनुषंगाने परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलेत सहभागी होवून प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांसाठी शाळेकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.यापुर्वी कला गुणांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत होती.
परंतु देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे विविध स्तरातून विद्यार्थ्यांना प्रस्ताव सादर करण्यात अडचणी येत होत्या.विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कलागुणांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत राज्यमंडळाने परीक्षा उशीरा होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ही मुदत पुर्वी १५ जानेवारीपर्यंत होती. अशी माहिती राज्यमंडळाच्या सचिव पोपटराव महाजन यांनी पत्राद्वारे दिली आहे.ललितकला, चित्रकला लोककला खेळ यातील विशेष प्राविण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच ते २५ गुण देण्यात येतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी या अतिरिक्त गुणांचा फायदा घेतात.
कला आणि क्रिडा क्षेत्रात प्राविण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांना यंदा मुकावे लागण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदा एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा, क्रिडास्पर्धा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास राज्यमंडळाने मुदत वाढवून दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज