टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील पडिक जमिनी सरकारकडे जाणार का, यावरून सुरू असलेल्या चर्चांना आता स्पष्टता मिळाली आहे. “माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या जमिनींना कोणताही धोका नाही;

तर ५०-१०० एकर जमिनी घेऊन त्या पडिक ठेवणाऱ्यांसाठी आणि लॅण्ड बँक तयार करणाऱ्यांसाठी हे आदेश आहेत,” असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

मूळ शेतकऱ्यांना कसलीही चिंता नाही
राज्यात १९४८ चा कुळ कायदा अस्तित्वात असून, त्यानुसार सलग तीन वर्षे जमीन पडिक राहिल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाकडे जाण्याची तरतूद आहे.

याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, जो सर्वसाधारण शेतकरी मूळ मालक आहे आणि स्वतः शेती कसतोय, त्याच्या जमिनीवर कुळ कायद्यानुसार असा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं किंवा संभ्रमात राहण्याचं कारण नाही.

लॅण्ड बँक आणि फार्महाऊसवाल्यांवर रोख
मग हा इशारा नेमका कोणासाठी आहे? यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, अनेक जण शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर जमीन खरेदी करतात, तिथे फार्महाऊस उभारतात, पण प्रत्यक्षात शेती न करता ती जमीन पडिक ठेवतात.

अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात लॅण्ड बँक तयार करून जमिनी पडून ठेवणं राज्याच्या हिताचं नाही. कृषी उत्पादन वाढवायचं असेल आणि राज्याचा व देशाचा जीडीपी (GDP) भक्कम करायचा असेल, तर पडिक जमिनी शेतीखाली आणणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
३ ते ५ वर्षांत लागवडीचे आदेश
कुळ कायद्यातील तरतुदींचा संदर्भ देत, पडिक जमिनी ३ ते ५ वर्षांत उत्पन्नाखाली आणाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. किमान पुढच्या तीन वर्षांत तरी ज्यांनी लॅण्ड बँक तयार केल्या आहेत, त्यांनी तिथे काहीतरी लागवड करून उत्पन्न घ्यावं, असं बावनकुळे यांनी ठामपणे सांगितलं.
राजू शेट्टींशी चर्चा, संभ्रम दूर
या विषयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. “माझं म्हणणं ऐकल्यानंतर ते माझ्या मताशी सहमत झाले असून, त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकूणच, शेतीची जमीन पडून न राहता ती उत्पादनाखाली यावी, यासाठी सरकारचा भर लॅण्ड बँकांवर असला तरी मूळ शेतकऱ्यांचं हित जपलं जाईल, असा सूर या वक्तव्यातून उमटला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












