टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर (प्रतिनिधी)
लाखामागे अवघ्या २ टक्के कमिशनवर तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील एका खासगी नोकरदाराची ९ लाख ९६ हजार १५० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विश्वास संपादन करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर थेट बनावट ‘प्री-सँक्शन लेटर’ पाठवण्यात आले, तर पैसे परत मागितल्यावर बंद असलेल्या बँक खात्याचा धनादेश देऊन बोळवण करण्यात आली.

याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरारजी पेठ येथील रहिवासी जयदीप दीपक पेंटर (वय ४१) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून एजंट सुष्मिता प्रशांत व्होटकर, प्रशांत सिद्धेश्वर व्होटकर (दोघे रा. संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) आणि पंढरपूर अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक अक्षय सुरवसे (रा. पंढरपूर) या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

असा रचला फसवणुकीचा सापळा
सिद्धेश्वर पेठेतील एका क्लिनिकमध्ये ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुष्मिता व्होटकर हिने जयदीप पेंटर यांची भेट घेऊन कमिशन तत्त्वावर मोठे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.

तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ५ कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जासाठी पेंटर यांनी १५ नोव्हेंबर २०२५ ते ५ जून २०२६ या कालावधीत यूपीआय, फोन-पे, एनईएफटी आणि रोख स्वरूपात टप्प्याटप्याने ९ लाख ९६ हजार १५० रुपये सुष्मिता हिच्या कॅनरा बँकेच्या खात्यावर वर्ग केले.

व्हॉट्सअॅपवर पाठवले बनावट ‘प्री-सँक्शन लेटर’
लाखो रुपये देऊनही कर्जाचे प्रकरण पुढे सरकत नसल्याने पेंटर यांनी सुष्मिताकडे विचारणा केली. त्यावर तिने २४ जून २०२६ रोजी “पंढरपूर अर्बन बँकेचे व्यवस्थापक अक्षय सुरवसे यांच्याकडे ७ कोटी ४२ लाखांचे कर्ज प्रकरण दिले आहे” असे सांगत पेंटर यांच्या व्हॉट्सअॅपवर बनावट ‘प्री-सँक्शन लेटर’चे फोटो पाठवले. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष कर्ज मंजुरीची प्रक्रिया ठप्पच राहिली.
बंद खात्याचा धनादेश देऊन फसवणूक
आपली फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने पेंटर यांनी भरलेली रक्कम परत मागितली. त्यावर प्रशांत व्होटकर याने १० ऑगस्ट २०२६ रोजी १० लाख रुपयांचा धनादेश (चेक) दिला. मात्र, पेंटर यांनी हा धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकला असता, संबंधित बँक खाते यापूर्वीच बंद करण्यात आल्याचे समोर आले.
या प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर पेंटर यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













