टीम मंगळवेढा टाईम्स न्युज । सोलापूर :
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सभागृहात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘स्वीकृत सदस्य’ (नामनिर्देशित सदस्य) निवडीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या निर्णयामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत तब्बल ७ नवीन स्वीकृत सदस्य वाढणार असून, प्रत्येक पंचायत समितीतही पाच सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य नेमला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.

नेमके राजकीय गणित काय?
जिल्हा परिषदेतील पक्षीय संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांचे वाटप निश्चित मानले जात आहे:

भाजप: सर्वाधिक संख्याबळ असल्याने ४ जागांवर भाजपचे वर्चस्व राहील.

शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट): दोन्ही पक्षांना प्रत्येकी १-१ जागा मिळणार आहे.

एका जागेवर तिढा कायम: उर्वरित सातव्या जागेसाठी चुरस रंगली आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) की स्थानिक आघाड्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या गटाच्या वाट्याला जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

असे असतील निवडीचे नवे नियम
ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार स्वीकृत सदस्य निवडीसाठी खालील निकष लागू करण्यात आले आहेत:

सदस्य संख्या: जिल्हा परिषदेत एकूण निर्वाचित सदस्यांच्या १० टक्के (किंवा किमान ५), तर पंचायत समितीत एकूण निर्वाचित सदस्यांच्या २० टक्के (किंवा किमान १) सदस्य नामनिर्देशित केले जातील.

स्थानिक रहिवासी अनिवार्य: संबंधित व्यक्ती ज्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती क्षेत्रातून निवडली जाणार आहे, तेथील रहिवासी असणे बंधनकारक असेल.

जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका: पक्षांचे संख्याबळ विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित नेत्यांशी सल्लामसलत करतील आणि योग्य नावांची शिफारस करतील. जिल्हा परिषदेने किंवा पंचायत समितीने ही शिफारस नाकारल्यास, त्याची ठोस कारणे लेखी स्वरूपात नोंदवणे बंधनकारक राहील.

कार्यकाळ: निवड झालेल्या सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षे किंवा विद्यमान सभागृहाची मुदत संपेपर्यंत राहील.
अपूर्णांकाचा पेच आणि ‘लकी ड्रॉ’ची तरतूद!
जागावाटप करताना संख्याबळानुसार अपूर्णांकाचा पेच निर्माण झाल्यास त्यासाठीही स्पष्ट नियम करण्यात आले आहेत. जर अपूर्णांक अर्ध्यापेक्षा कमी असेल,
तर ती जागा व्यपगत (लॅप्स) मानली जाईल. मात्र, दोन पक्ष किंवा गटांचे अपूर्णांक समान आल्यास चिठ्ठीद्वारे (सोडत) सदस्याची निवड केली जाणार आहे.
या अधिसूचनेमुळे आता सभागृहात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












