टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे आज सकाळी महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याची माहिती आज सकाळपासून सूत्रांकडून मिळत होती. तर दुसरीकडे संभ्रमाची अवस्था असल्याने एकनाथ शिंदे आज सकाळी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
वरिष्ठ सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे आज सकाळी 9 ते साडे दहा वाजेच्या दरम्यान प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निर्णय नेमका काय असणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
शिवसेनेत काल दिवसभर चर्चा होती की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंध महाराष्ट्र 24 तास फिरुन जनतेचं काम केलं आहे. त्याचा फायदा शिवसेनेला जितका झाला आहे तितकाच महायुतीला देखील झाला आहे. त्यापेक्षा जास्त फायदा भाजपला झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराने आपली भावना मुख्यमंत्र्यांना कळवली आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे उद्या महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत. त्यानंतर ते आज दिल्लीला देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आपल्याकडे दीड वर्ष मुख्यमंत्रीपद असावं, अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या नेतृत्वात व्हाव्यात, अशी शिंदे यांची मागणी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता भाजप हायकमांड काय निर्णय घेतं? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.
अमित शाह आज मुंबईत येणार, सूत्रांची माहिती
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीला गेले होते. त्यांची आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा होणार आहे. यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह हे आज मुंबईत येणार आहेत.
अमित शाह निरीक्षक म्हणून आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीतच आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे.
मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असे एकनाथ शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज