टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूरमधील स्थानिक नागरिकांना आज ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग केलेले नसले तरी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिवसभर मुखदर्शनासाठी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे आठ महिने श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद होते. 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा आदेश शासनाने दिला.
त्यानंतर श्री विठ्ठल – रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांना मंदिरात सोडण्यास सुरवात झाली होती.
त्याच काळात कार्तिकी यात्रेत तीन दिवस (25 ते 27 नोव्हेंबर) मुखदर्शन पुन्हा भाविकांसाठी बंद करण्यात आले होते.तथापि, पंढरपूरमधील स्थानिक नागरिकांकडून “श्रीं’चे दर्शन देण्याची मागणी होत होती.
ती विचारात घेऊन आज सकाळी सहा ते रात्री 12 या वेळात पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात मुखदर्शनासाठी सोडण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
त्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. मात्र, पंढरपूर शहरातील नागरिक असल्याबाबत पुरावा (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र) सोबत आणणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांपुढील व्यक्ती आणि दहा वर्षांपेक्षा लहान मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येण्याचे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज