टीम मंगळवेढा टाईम्स । माढा
शासनाकडून मानधन मिळत असतानाही ई-पीक पाहणीच्या नावाखाली शेतकऱ्याकडून पैशांची उकळप करणाऱ्या एका ई-पीक पाहणी सहाय्यकावर माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चैतन्य दिगंबर शेटे (रा. उपळाई बुद्रूक) असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यकाचे नाव असून, तहसीलदारांनी त्याची नोंदणी तातडीने रद्द करत फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत.

नेमके काय घडले?
शासनाच्या नियमानुसार ई-पीक पाहणीचे काम करण्यासाठी नियुक्त सहाय्यकांना मानधन दिले जाते. तरीही उपळाई बुद्रूक येथील सहाय्यक चैतन्य शेटे याने शेतकरी दादासाहेब भारत गावडे यांच्याकडे पाच गटांच्या पीक पाहणीसाठी प्रति गट १०० रुपये याप्रमाणे ५०० रुपयांची मागणी केली.

शेतकऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर, “तुम्ही तुमचे काम स्वतःच करा,” असे उद्धट उत्तर दिले. इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास दुष्काळी अनुदान मिळणार नाही, अशी थेट भीती दाखवून शेतकऱ्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी आणि सहाय्यक यांच्यातील या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप २७ सप्टेंबर रोजी सोशल मीडियासह विविध माध्यमांमध्ये व्हायरल झाली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याची दखल घेत ग्राम महसूल अधिकारी श्रावण काशीनाथ भोये यांनी तात्काळ माढ्याच्या तहसीलदारांना लेखी अहवाल सादर केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तहसीलदारांनी शेटे याची सहाय्यक पदावरील नोंदणी त्वरित रद्द केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी भोये यांच्या फिर्यादीवरून माढा पोलीस ठाण्यात चैतन्य शेटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












