टीम मंगळवेढा टाईम्स ।
घरासमोर उभारलेला लग्नाचा मांडव, स्वयंपाकाची सुरू असलेली लगबग आणि काही तासांवर येऊन ठेपलेला विवाह सोहळा… मात्र, मंगळवेढा पोलिसांनी ऐनवेळी धडक मारत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह यशस्वीरीत्या रोखला. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे एका बालिकेचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचले आहे.

नेमकी घटना काय?
मंगळवेढा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा साखरपुडा उरकून तिचा विवाह लावून देण्याची जोरदार तयारी सुरू होती. या गंभीर प्रकाराची गुप्त माहिती सोलापूर येथील महिला कल्याण समितीला मिळाली. समितीने कोणतीही वेळ न दवडता तत्काळ मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

घटनास्थळी पोलिसांची धाड :
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट पोलिस हवालदार नितीन पलुसकर, सहाय्यक फौजदार सिद्धेश्वर माळी व हवालदार शिंदे यांच्या पथकाने तातडीने संबंधित गावात धाव घेतली. तिथे पोहोचताच घरासमोर लग्नाचा मांडव उभारलेला दिसला तसेच जेवणावळीची तयारी वेगात सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पालकांकडून लेखी हमीपत्र :
पोलिसांनी घटनास्थळावरून अल्पवयीन मुलगी, होणारा नवरा मुलगा आणि त्यांच्या पालकांना ताब्यात घेऊन मंगळवेढा पोलिस ठाण्यात आणले. तेथे मुलीच्या आई-वडिलांचे समुपदेशन करण्यात आले. मुलगी सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असा स्पष्ट लेखी जबाब पालकांकडून लिहून घेण्यात आला.

याशिवाय, कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून मुलीचे वडील आणि मुलाचे वडील या दोघांनाही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६८ अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करत आहेत. मंगळवेढा पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









