मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील वाळूमाफियांची यादी तयार असून, पहिल्या टप्प्यात गुरुवारी पाच जणांवर एमपीडीएची कारवाई केली आहे. यातील तिघांना ताब्यात घेतले आहे.
कारवाईपासून वाचण्यासाठी एकाने मोठी राजकीय शक्तीचा वापर केला आहे. परंतु यात कोणतीही राजकीय शक्ती कामी येणार नाही, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल गुरुवारी स्पष्ट केले.
येथील नियोजन भवनात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापुढे जिल्ह्यात वाळू चोरांना सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत चर्चा झाली. प्राथमिक शाळेच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही लावता येईल, त्यासाठी आवश्यक निधी किती लागणार आहे. यावरही चर्चा झाली.
जिल्हा परिषदेत बसून शाळेत काय सुरू आहे, याची तपासणी अधिकाऱ्यांना करता येईल. त्यासाठी सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम घेण्याची सूचना केली. त्यानुसार गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी वेगाने काम करण्याची सूचना केली आहे.
डीपीसीच्या कामांना मे मध्ये मान्यता घ्या
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नियोजित विकासकामांना लवकर मंजुरी न मिळाल्याने कामे मंदगतीने चालतात. एका महिन्याच्या आत प्रस्तावित कामांचा आराखडा तयार करून त्या कामांना मेमध्येच प्रशासकीय मान्यता घेण्याची सूचना केली आहे.
मेमध्येच कामांना अंतिम मान्यता मिळविण्याच्या दृष्टीने तयारी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
विमानसेवेची तयारी अंतिम टप्प्यात, लवकरच सोलापूरकरांना गोड बातमी
सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात असून, लवकरच सोलापूरकरांना गोड बातमी मिळेल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी सोलापुरात दिली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात माहिती दिली.
या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, संघटन प्रभारी माजी खासदार अमर साबळे, दीपक नागपुरे, सरचिटणीस शशिकांत चव्हाण, नारायण बनसोडे, संजय कोळी, नागेश सरगम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसमधील नेत्यांची काळजी घेऊ
माजी आमदार दिलीप माने यांच्या घरी आपण भेट देणार आहात. आ. माने हे काँग्रेसला कंटाळले आहेत. त्यांच्या भेटीमागे काही राजकीय हालचाली आहेत का, असे पत्रकारांनी विचारले असता पालकमंत्री गोरे म्हणाले, काँग्रेसला संपूर्ण जनता कंटाळली आहे. अशा जनतेची आम्ही निश्चित काळजी घेऊ. आम्ही जनतेसोबत आहोत. काँग्रेसमधील नेत्यांचीही आम्ही काळजी घेऊ, असे त्यांनी माने यांचे नाव न घेता सांगितले.
खंडणीप्रकरणी भरपूर बोलेन
एका महिलेने केलेल्या आरोपाबाबत पत्रकारांनी विचारले असता पालकमंत्री म्हणाले, याप्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत. खंडणीप्रकरणी मला भरपूर बोलायचे आहे. निश्चित बोलेन. वेळ आल्यावर सर्व मांडेन,(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज