टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील तहसील कार्यालयातील २३ पदे रिक्त असल्याने कार्यालयातील कामकाजात अडथळे येत असून कामात सुसूत्रता नाही. यासाठी ही पदे तत्काळ भरली जावीत अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा नियोजन सदस्य भगीरथ भालके यांनी केली आहे.
तहसील कार्यालयात अव्वल कारकून , मंडल अधिकारी , तलाठी व महसूल सहाय्यक इत्यादी पदे अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने विविध प्रकारचे दाखले, सात / बारा चूक दुरुस्ती, रस्ते संबंधित केसेस, अभिलेख कक्षातील नक्कल , अशा नानाविध प्रकारच्या कामकाजासाठी नागरिकांची तहसील कार्यालयामध्ये रेलचेल वर्दळ असते.
तहसील कार्यालयात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना अधिकच्या कामामुळे कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील महसूलविषयक कामकाजावर विपरित परिणाम होत असून नागरिकांचीकामे वेळेवर होत नाहीत.
तहसील कार्यालयातील विविध अनुषंगाने असणारी पदे भरण्यात आली तर कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता येऊन तालुक्यातील कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामाविषयी समाधान होईल व रिक्त जागेवरील प्रलंबित कामे मार्गी लागतील.
यासाठी ही २३ रिक्त पदे तत्काळ भरण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा , अशी भूमिका जिल्हा नियोजन सदस्य भगीरथ भालके यांनी पत्राद्वारे मांडली असून या पत्राची प्रत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज