टीम मंगळवेढा टाईम्स : संपादक : समाधान फुगारे (7588 214 814)
पोलीस ठाण्यातील कामकाज, कागदपत्रे आणि गुन्हेगारी जगतातील तपासाच्या धावपळीत काल एका हृदयद्रावक प्रसंगाने उपस्थित प्रत्येकाचे मन सुन्न केले. आयुष्यभर कष्ट उपसून वाढवलेल्या मुलीसमोर तिची विधवा आई आणि लहान बहीण अश्रू गाळून पदर पसरत होत्या,

पण प्रेमात आंधळी झालेल्या त्या तरुणीने पोटच्या आईला परके करत, “माझ्या जिवाला यांच्यापासून धोका आहे,” असा पवित्रा घेतला. या घटनेने आजच्या कौटुंबिक मूल्यांवर आणि कायद्याच्या तरतुदींवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे वारी परिवाराचे सतीश दत्तू यांनी सांगितले.

”तुझ्या बहिणीचं कसं होणार? घरी चल ग…”
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी स्वतःपेक्षा वयाने लहान आणि कोणतीही कमाई नसलेल्या एका तरुणासोबत घरातून निघून गेली होती. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. त्या ठिकाणी आई आणि लहान बहीण तिच्यासमोर अक्षरशः रडून विनवणी करत होत्या.

“तुझे वडील गेल्यानंतर तुला शिकवण्यासाठी मी रक्ताचे पाणी केले. तू घरी परत चल, तुला चांगला कमावणारा मुलगा पाहून सन्मानाने लग्न लावून देऊ. आज तू अशी वागलीस तर समाजात आमची काय पत राहील? तुझ्या लहान बहिणीचे लग्न कसे होणार?” असा आक्रोश ती विधवा आई करत होती.

मात्र, त्या तरुणीवर आईच्या एकाही शब्दाचा वा अश्रूंचा परिणाम झाला नाही. तिने पोलिसांसमोर स्वतःच्या कुटुंबाला अनोळखी ठरवत त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला.

वैयक्तिक स्वातंत्र्य विरुद्ध कौटुंबिक उत्तरदायित्व
अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वतःचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार प्रत्येकाला आहेच; परंतु ज्या आई-वडिलांनी आयुष्य पणाला लावून मुलांना सक्षम केले, त्यांच्या भावना आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य यांचा पूर्ण विसर पडणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे.

क्षणिक भावनिक आकर्षणापोटी किंवा अपरिपक्व वयात घेतलेले असे निर्णय पुढे जाऊन अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात, असाच प्रत्यय अशा घटनांमधून वारंवार येत आहे.

”पालकांची संमती बंधनकारक असावी” वारी परिवाराची वाढती मागणी
या घटनेचे साक्षीदार ठरलेल्या एका सुजाण व संवेदनशील नागरिकाने यावर तीव्र खंत व्यक्त करत शासनाकडे ठोस धोरणाची मागणी केली आहे.
“मुलांचे १८ वर्षांपर्यंत संगोपन करणे जशी पालकांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी असते, तसेच विवाहासारख्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये आई-वडिलांपैकी एकाची किंवा कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी वा अधिकृत परवानगी कायद्याने बंधनकारक केली पाहिजे.

कोणत्याही पालकांना आपल्या पाल्याचे नुकसान व्हावे असे वाटत नाही. केवळ कायदेशीर वयाचा दाखला देऊन संस्कार आणि कुटुंबाला वाऱ्यावर सोडण्याच्या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे,” अशी भावना व्यक्त होत आहे.
पोलीस ठाण्यातील त्या आईचे हुंदके केवळ एका कुटुंबाचे दुःख नव्हते, तर ती आधुनिक समाजव्यवस्थेतील तुटत चाललेल्या कौटुंबिक धाग्यांची एक आर्त हाक होती. कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी आणि तरुणाईला चुकीच्या पावलांपासून रोखण्यासाठी आता समाज आणि शासनाने वेळीच पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












