मंगळवेढा टाईम्स न्यूज ।
कोरोना काळात प्राण गमावलेल्या निष्पाप मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. कोरोना महामारीत दगावलेल्या तब्बल २२ रुग्णांवर चक्क ६ वर्षांनंतर उपचार केल्याचे कागदोपत्री दाखवून, शहरातील तीन नामांकित खाजगी रुग्णालयांनी सुमारे २ कोटी रुपयांचा डल्ला मारल्याचा धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे.

याप्रकरणी तिन्ही रुग्णालयांच्या संचालकांविरोधात मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी योजनांचा गैरवापर, ३९२ बोगस प्रकरणे उघड
गरीब आणि गरजू रुग्णांसाठी असलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना’ आणि केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेचा गैरफायदा घेत हा महाघोटाळा रचण्यात आला. प्राथमिक चौकशी अहवालानुसार तब्बल ३९२ बोगस प्रकरणे समोर आली आहेत.

यामध्ये ५ लाखांहून अधिक रकमेचे दावे एकाच मोबाईल क्रमांकावरून नोंदवले गेले होते, तर ३६१ रुग्णांनी प्रत्यक्षात इतर रुग्णालयांत उपचार घेतले असताना त्यांची नावे या योजनेच्या लाभासाठी परस्पर वापरण्यात आली.
घोटाळेबाज रुग्णालये आणि लाटलेली रक्कम:
नाशिक ग्रेस हॉस्पिटल (सिडको): संचालक राहुल श्रीराम पाटील व सागर पाटील यांनी १२६ बोगस प्रकरणांद्वारे ६२ लाख १३ हजार ६०० रुपये लाटले. यात ७ मृत व्यक्तींच्या नावांचा समावेश होता.

शिव मल्टिस्पेशालिटी (सातपूर): संचालक डॉ. त्रिलोक पाटील व राहुल पाटील यांनी १६३ प्रकरणांतून ७१ लाख ८३ हजार ६०० रुपये हडप केले. यात ७ मृतांवर उपचार दाखवण्यात आले.
ऋषिकेश हॉस्पिटल (गंगापूर रोड): संस्थापक प्रशांत जाधव व प्रीतम पाचपुते यांनी ७२ बोगस प्रकरणांतून ४५ लाख ४५ हजार ७५० रुपयांचा अपहार केला. यात ८ मृतांच्या नावांचा समावेश होता.
मुंबईत गुन्हा दाखल; अटकपूर्व जामीनही फेटाळला
राज्य आरोग्य हमी सोसायटी व रुग्णालयांमधील करारातील अटीनुसार (कलम ३२/४) कायदेशीर कारवाईचे अधिकार क्षेत्र मुंबई असल्याने, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव चंद्रकांत विभुते यांच्या तक्रारीवरून मुंबईतील वरळी पोलिसांत १ कोटी ७९ लाख ४२ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका रुग्णालयाच्या संचालकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
’एसआयटी’मार्फत स्वतंत्र चौकशीचे आदेश
विधानसभेत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या सखोल तपासामुळे आरोग्य यंत्रणेतील आणखी काही बडी धेंडे आणि शासकीय हस्तक गजाआड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














