मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाने सोलापूर विधानपरिषद जागेसाठी अखेर बार्शीचे राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
मात्र, राऊत यांच्या या उमेदवारीमुळे सोलापूर भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी चव्हाट्यावर आली आहे. पंढरपूरचे मातब्बर नेते प्रशांत परिचारक यांना डावलून राऊत यांना संधी दिल्यामुळे सध्या परिचारक समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
‘त्या’ शब्दाचे काय झाले? परिचारक समर्थकांचा सवाल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींनी प्रशांत परिचारक यांना विधानपरिषदेचा शब्द दिला होता, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मात्र, आता प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होताना परिचारक यांचे नाव मागे पडल्याने समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. परिचारक गटाची ही नाराजी आता भाजपसाठी आगामी काळात डोकेदुखी ठरणार का? आणि भाजप पक्षश्रेष्ठी ही नाराजी कशा प्रकारे दूर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आवताडेंच्या विजयाचे शिल्पकार; तरीही डावलले?
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या दणदणीत विजयामध्ये प्रशांत परिचारक आणि त्यांच्या गटाचा सिंहाचा वाटा होता.

परिचारक यांनी पूर्ण ताकदीने आवताडे यांच्या पाठीशी उभे राहून पक्षाला विजय मिळवून दिला होता. असे असतानाही, पक्षाने त्यांच्या निष्ठेचा विचार न करता राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिल्याने परिचारक गटात ‘वापसून सोडून दिले’ अशी भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

राऊत यांच्या उमेदवारीने सोलापूरचे राजकारण तापले
दुसऱ्या बाजूला, बार्शीचे राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांची सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पकड आणि आक्रमक शैली लक्षात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतल्याचे समजते.

परंतु, एका नेत्याला खूश करताना दुसऱ्या बड्या नेत्याला नाराज करण्याचा हा भाजपचा डाव सोलापूरच्या स्थानिक राजकारणात कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सोलापूर विधानपरिषदेची ही जागा आता केवळ जिंकण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भाजपला आधी आपल्याच घरातील ‘नाराजीचा होम’ शांत करावा लागणार आहे. परिचारक यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसणार की भाजप डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होणार, याचे उत्तर येणारा काळच देईल!

विधान परिषदेसाठी भाजपचे 11 उमेदवार जाहीर; परीचारकांना डावलून राऊतांना उमेदवारी
भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच जळगाव मधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपचे 11 उमेदवार
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी
भंडारा-गोंदिया – श्री अविनाश ब्राह्मणकर
अमरावती – श्री प्रविण पोटे पाटील
सांगली-सातारा – श्री धैर्यशील कदम
सोलापूर – श्री राजेंद्र राऊत
अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना – श्री सुहास शिरसाट
नांदेड – श्री अमर राजूरकर
धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील
जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन
नागपूर – डॉ.राजीव पोतदार
दिल्लीतून झाली घोषणा
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. नावं निश्चित करण्यासाठी अनेक बैठकाही झाल्या होत्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











