टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार आणि भाजपकडे मुख्यमंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपमधून देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार हीदेखील खात्रीलायक माहिती आहे.
नव्या सरकारसमोर रोजगार निर्मिती, राज्याचा आर्थिक गाडा सुरळीत आणणे यासह अनेक आव्हानं असणार आहेत. राज्यापुढील सामाजिक आव्हानांपैकी सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे मराठा आरक्षण टिकवणार कसं?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिलेलं 10 टक्के आरक्षण टिकवण्यासाठी नव्या सरकारला आता प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण या आधीही मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं होतं आणि न्यायालयाने तो आदेश रद्द केला होता.
मराठा आरक्षण कसं टिकवणार?
महायुतीच्या नव्या सरकारची सर्वाधिक कसोटी लागणार आहे ती मराठा आरक्षण टिकवण्यासाठी. कारण फेब्रुवारी 2024 मध्ये SEBC अंतर्गत मराठा समाजाला राज्य सरकारनं 10 टक्के आरक्षण दिलं. त्यानंतर लगेचच म्हणजे पाच मार्चपासून या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. म्हणूनच 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकवणं हे नव्या सरकारसमोर नवं चॅलेंज असणार आहे.
आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज
दिनांक 29 ऑगस्ट 2023… स्थळ अंतरवाली सराटी. इथं मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले. उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे 31 ऑगस्टला इथं एक लाठीचार्जची घटना घडते आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटतात.
त्यानंतर 1 सप्टेंबरपासून सुरु झालेली ही चळवळ आजही सुरु आहे. त्याच चळवळीतून मनोज जरांगे पाटील नावाचा एक मराठा नेता उदयास आला. तो मराठा तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्यभर आंदोलनाचं मोहोळ उठवलं. सर्व मराठे हे कुणबी असून त्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आणि त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. जिल्ह्याजिल्ह्यांत सुरू झालेलं हे आंदोलन मुंबईकडे वळलं.
SEBC अंतर्गत 10 टक्के आरक्षण
मनोज जरांगे यांनी आंदोलकांना घेऊन मुंबईची वाट धरली. त्यांना पदोपदी मोठा पाठिंबा मिळत गेला. लाखो मराठ्यांचं हे वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच शिंदे यांच्या सरकारने त्याला प्रतिसाद दिला आणि जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं.
त्यानंतर राज्य सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये SEBC अंतर्गत मराठा समाजाला राज्य सरकारनं 10 टक्के आरक्षण जाहीर केलं. पण त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा मनोज जरांगे यांनी आरोप केला. या सगळ्याचा राग त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर काढला. मराठा आंदोलनात गेल्या वर्षभरात काय काय झालं ते महाराष्ट्राला माहितीय.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आंदोलनानं राज्याच्या राजकारणावर काय काय परिणाम झालेत. हे आपण लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षच पाहिलं आणि मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवरचा रागही साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. त्यामुळं राज्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर काय काय होऊ शकतं याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज