मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC) निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवसापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सोमवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील माहितीनुसार, बँकेच्या उर्वरित आठ जागांवरील उमेदवारांची अंतिम नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निश्चित केली जाणार आहेत.

नेमके काय ठरले बैठकीत?
माजी आमदार दिलीप माने यांच्या तिऱ्हे येथील फार्म हाऊसवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक तालुक्यातील विकास सोसायट्यांचे उमेदवार निश्चित झाले आहेत.

मात्र, आरक्षित प्रवर्गातील ५ जागा आणि पणन प्रक्रिया, दुग्ध संस्था व नागरी बँका-पतसंस्था या प्रवर्गातील ३ जागा, अशा एकूण ८ जागांवरील उमेदवारांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करून घेतला जाईल. या बैठकीनंतर पालकमंत्री तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

अंतिम यादी वाचनाची जबाबदारी राजन पाटील यांच्याकडे
मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी एकमताने ही अंतिम यादी वाचून दाखविण्याचा अधिकार राजन पाटील यांना दिला आहे. आज मंगळवारी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास ही अंतिम यादी प्राप्त होईल, अशी माहिती राजन पाटील यांनी दिली आहे.

अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांसमोर पेच
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे दुपारी दीडच्या सुमारास यादी जाहीर झाल्यानंतर, उर्वरित दीड तासात आपल्या मर्जीतील आणि समर्थक उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची कसरत नेत्यांना करावी लागणार आहे.
यासोबतच मोहोळ, बार्शी आणि मंगळवेढा या बिनविरोध झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्येही आपलेच उमेदवार निवडून येतील, यासाठी आवश्यक राजकीय समीकरणे जुळवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत सर्वांना दिल्या आहेत.
बैठकीतील प्रमुख उपस्थिती:
तिऱ्हे येथील या महत्त्वपूर्ण बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार बबनराव शिंदे, राजन पाटील, बबनराव आवताडे, दिलीप माने, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे पाटील, जयवंतराव जगताप, दिग्विजय बागल आणि सुरेश हसापुरे आदी दिग्गज नेते उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












