टीम मंगळवेढा टाईम्स :
खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तथा दामाजी शुगरचे संचालक मा. सिद्धेश्वर आवताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरकार परिवार व आवताडे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आज १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत भव्य ‘महाआरोग्य सप्ताह शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, या उदात्त हेतूने हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये विविध वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सात दिवस, सात आरोग्य उपक्रम
१ नोव्हेंबर – भव्य रक्तदान शिबिर
वाढदिवसाच्या पहिल्याच दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदानासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

२ नोव्हेंबर – अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिर
डॉ. धवल आवताडे (MBBS, MS Ortho) यांच्या मार्गदर्शनाखाली हाडांचे व सांध्यांचे विविध आजार, गुडघेदुखी, पाठदुखी तसेच अस्थिरोगासंबंधित समस्यांवर मोफत तपासणी, उपचार व वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे.

३ नोव्हेंबर – मूत्ररोग निदान शिबिर
डॉ. आदिन चोपडे (Urologist, मिरज) व दक्षता हॉस्पिटल, सांगोला यांच्या सौजन्याने मूत्ररोगासंबंधित आजारांचे निदान व वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे.
४ नोव्हेंबर – कान, नाक व घसा तपासणी शिबिर
डॉ. सुजित शिवशरण (MBBS, MS ENT, मिरज) यांच्या माध्यमातून कान, नाक व घशाच्या विविध आजारांची तपासणी व उपचारविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

५ नोव्हेंबर – जनरल सर्जरी विभाग शिबिर
डॉ. महेश कोडलकर (MBBS, MS Surgeon) यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेशी संबंधित आजारांची तपासणी, निदान व उपचारविषयक सल्ला दिला जाणार आहे.
६ नोव्हेंबर – भव्य नेत्र तपासणी शिबिर
डॉ. तृषाल यादव (MS Ophthalmology) व श्री टेके आय हॉस्पिटल, सांगली यांच्या सौजन्याने नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डोळ्यांच्या विविध आजारांची तपासणी करून योग्य वैद्यकीय मार्गदर्शन केले जाणार आहे.

७ नोव्हेंबर – हृदयरोग तपासणी शिबिर
डॉ. सुनील पवार (Cardiologist, पंढरपूर) यांच्या माध्यमातून हृदयविकारासंबंधित तपासणी, निदान व आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे.
आरोग्यसेवेच्या माध्यमातून वाढदिवसाचा सामाजिक संदेश
मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, आर्थिक अडचणींमुळे कोणालाही आरोग्य तपासणीपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. सात दिवस चालणाऱ्या या महाआरोग्य सप्ताहाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरकार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
हार-तुरे, फेटे आणि फ्लेक्सऐवजी शैक्षणिक साहित्य; सिद्धेश्वर आवताडे यांचा स्तुत्य निर्णय
दरम्यान, वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर आवताडे यांनी घेतलेला आणखी एक निर्णय सध्या मंगळवेढा तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि समाजासमोरील आर्थिक आव्हाने लक्षात घेऊन त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हार, फेटे, डिजिटल शुभेच्छा आणि फ्लेक्स यांवर अनावश्यक खर्च न करता, त्याऐवजी शैक्षणिक साहित्य भेट देण्याचे आवाहन सहकारी, मित्रपरिवार, वडीलधारी मंडळी आणि हितचिंतकांना केले आहे.
आपल्या नावाने शैक्षणिक साहित्य खरेदी करून ते खरेदी-विक्री संघात जमा करावे, जेणेकरून या साहित्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयोग होईल, अशी त्यांची भूमिका आहे.
‘वाढदिवसाचा खर्च सत्कारावर नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर व्हावा’ हा या निर्णयामागील विचार समाजाला एक नवी दिशा देणारा आहे. वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या शुभेच्छांचे रूपांतर शैक्षणिक मदतीत व्हावे आणि गरजू विद्यार्थ्यांच्या हातात शिक्षणाचे साहित्य पोहोचावे, हा या उपक्रमाचा खरा हेतू आहे.
एकीकडे आरोग्यसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा हात आणि दुसरीकडे शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला बळ देण्याचा प्रयत्न, अशा दुहेरी सामाजिक उपक्रमातून सिद्धेश्वर आवताडे यांनी वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श पायंडा घालून दिला आहे.
त्यांच्या या निर्णयाचे मंगळवेढा शहर व तालुक्यातील नागरिकांकडून स्वागत होत असून, वाढदिवस साजरा करण्यापेक्षा वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











