मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी बुधवारी जिल्हा बँकेला मिळाली.
या यादीत पंढरपूर तालुक्यातील खर्डी, सिद्धेवाडी, गोपाळपूर व तावशी येथील विकास सोसायटीच्या २१ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या कर्जाची १२ लाख ३० हजार ५३७ रुपये इतकी रक्कम माफ झाली आहे. दरम्यान, उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्यांकडे लक्ष लागले आहे.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दोन लाखांपर्यतच्या कर्जमाफीच्या याद्या बुधवारी प्रसिद्ध होतील असे जाहीर केले होते.
त्याप्रमाणे पहिल्या यादीमध्ये पंढरपूर तालुक्यातील तावशी, सिद्धेवाडी, गोपाळपूर आणि खर्डी या चार गावांमधील २१ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

यामध्ये तावशी गावातील सर्वाधिक नऊ शेतकऱ्यांची पाच लाख ३४ हजार ८६९ रुपये, सिद्धेवाडीच्या सात शेतकऱ्यांची तीन लाख ९३ हजार ७०३ रुपये, गोपाळपूरमधील तीन शेतकऱ्यांची एक लाख ८२ हजार १६ रुपये, खर्डी येथील दोन शेतकऱ्यांची एक लाख १९ हजार ९४९ रुपये अशी १२ लाख ३० हजार ५३७ रुपये इतकी रक्कम कर्जमाफीतून बँकेला मिळणार आहे. कर्जाचा असलेला बोजा कमी केल्यानंतर सातबारा कोरा होणार आहे.

जिल्ह्यात ५,६९९ शेतकरी पात्र..
सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत २३,३२३ थकबाकीदार सभासद आहेत. यापैकी नव्या निकषानुसार दोन लाखांपर्यंत थकीत असलेले जवळपास ५ हजार ६९९ शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत.

त्यांची ५८ कोटी ५३ लाख ९५ हजार रुपये इतकी थकीत रक्कम माफ होणार असल्याची जिल्हा बँकेची आकडेवारी आहे. आणखीन सुधारित आदेश आल्यास काही बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्यक्ष मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरणासाठी, प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत संपर्क साधावा.
प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक, तसेच यादीत नावापुढे नमूद केलेला विशिष्ट क्रमांक सोबत नेणे बंधनकारक केले आहे.

मुख्यमंत्री देणार कोरा सातबारा..
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झाली असून, पांडुरंगाच्या साक्षीने पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र व कोरा सातबारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












