मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने दुष्काळ निवारणासाठी थेट युद्धपातळीवर पावले उचलली आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत राहणारी विशेष ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात येत आहे.

या माध्यमातून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि इतर समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

४८ तासांत पोहोचणार पाण्याचा टँकर
पाणीटंचाई तीव्र असलेल्या गावांमध्ये मागणी नोंदवल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आत पाण्याचा टँकर पोहोचवला जाईल. दुष्काळात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून प्रशासन पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून, वॉर रूमच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर २४ तास बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

सक्तीने कर्जवसुली केल्यास थेट गुन्हा
दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकरी व मजुरांना वेठीस धरणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांनी कोणत्याही परिस्थितीत सक्तीने कर्जवसुली करू नये, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दसऱ्यानंतर विभागनिहाय हेल्पलाइन नंबर
शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच विभागनिहाय स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले जाणार आहेत. दसऱ्यानंतर हे सर्व संपर्क क्रमांक जनतेसाठी खुले होतील. या हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारी आणि झालेल्या कामाचा आढावा स्वतः वरिष्ठ अधिकारी दररोज घेणार आहेत.

जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर
आचार संहिता संपल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बँक व मायक्रो फायनान्समार्फत शेतकरी व नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देणार.
४८ तासांच्या आत टँकर परवानगी आणि ६०० टैंकर चालवण्यासाठी फिडिंग पॉईंटची दुरुस्ती. सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी प्रयत्न करणार.
डीपीडीसीमधून दुष्काळाची कामे हाती घेऊन १ नोव्हेंबरपासून ‘व्हिबीजीरामजी ‘ची कामे सुरू करणार. महापालिका व नगरपालिकांचा आढावा घेऊन १० टक्के पाणीकपात करण्याचे आदेश आणि जलजीवनची कामे प्राधान्याने मार्गी लावणार.
उजनीतील प्रकल्पांचा फायदाच होणार
उजनी धरण परिसरात प्रस्तावित सोलर आणि डेटा सेंटर या दोन मोठ्या प्रकल्पांमुळे पाणी कमी होणार नसून उलट २ टीएमसी पाणी वाचणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. डेटा सेंटरसाठी केवळ अर्धा टीएमसी पाणी लागेल, तर सोलर प्रकल्पामुळे अडीच टीएमसी पाणी वाचेल. सर्वाच्या संमतीनेच हे प्रकल्प पुढे नेले जातील, असे सांगत त्यांनी स्थानिकांना आश्वस्त केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













