टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील एम. आय. डी. सी. परिसरातून चार वर्षीय बालकाचे अपहरण करून पंधरा दिवसाचा कालावधी उलटूनही तो सापडत नसल्याने त्या बालकाच्या जीवासाठी
दामाजीनगर परिसरातील महिला वर्ग एकवटला असून त्यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांची प्रत्यक्ष भेट घेवून या बालकाचा तात्काळ तपास लावावा असे लेखी निवेदन देवून मागणी केली आहे.
दि.18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.00 वा. एम.आय.डी.सी.परिसरातून रणवीरकुमार साहू (वय 4 वर्षे) याचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केले आहे.
या घटनेचा मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल असून पोलिस यंत्रणाही त्याचा शोध घेत आहे. मात्र तो मिळून येत नसल्याने त्यांचे कुटुंबिय हतबल झाले आहे. लवकरात लवकर या मुलाचा शोध घेवून त्या कुटुंबियांना आधार दयावा अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे.
घटना घडल्यानंतर तात्काळ तपास वरिष्ठ अधिकार्यांकडे देणे अपेक्षित असताना तो एका पोलिस हवालदाराकडे दिल्याने तपासात दिरंगाई झाल्याचा आरोप या निवेदनात सदर महिलांनी केला आहे.
या अपहरण झालेल्या मुलामुळे या परिसरातील बालक व पालक सध्या भितीच्या छायेखाली असून मुलांना शाळेत पाठवितानाही त्यांच्या मनावर दडपण येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निष्पाप बालकाचा तपास ताबडतोब लावावा व बेजबाबदारपणा दाखविलेल्यावरती कारवाई करावी अन्यथा सर्व महिला व त्यांची लहान मुले घेवून दि.११ डिसेंबर रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन वरती धडक मोर्चा काढणार असल्याचे निवेदन पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांना दिले आहे.
याच्या माहितीस्तव प्रती राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे, मंगळवेढयाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांना देण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर यशोदा जावीर, सविता धुमाळ, वंदना धुमाळ, दिपाली खवतोडे, सुवर्णा शिंदे, रंजना मुढे, सुनिता कांबळे, सुनिता लेडवे, शशिकला ढगे, सविता गांडुळे, नंदादीप बाबर, राजश्री रणदिवे, विमल घुले यांच्यासह 37 महिलांच्या सह्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज