टीम मंगळवेढा टाईम्स ।
येत्या 18 डिसेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात आतापासूनच वातावरण तापले आहे.
अशात परफेक्ट उमेदवाराचा पक्षांकडून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकही आपणच बेस्ट हे दाखवून देण्यासाठी तयारीला लागले आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव, सोड्डी, बावची, पौट, पाठकळ, मारोळी, हाजापुर, शिरनांदगी, येड्राव, गोणेवाडी, खोमनाळ, फटेवाडी, रहाटेवाडी, तळसंगी, भालेवाडी, मारापुर, गुंजेगांव व ढवळस या 18 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीपैकी 25 टक्केहून अधिक म्हणजे 18 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची हि लिटमस टेस्ट मानली जात आहे.
मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे गट, परिचारक गट, बबनराव आवताडे गट व भालके गट त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना गट हा सुद्धा मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. तर यांच्यातच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.
यामध्ये कार्यकर्त्यांसाठी पार्ट्यांचे आयोजनही सुरू झाले आहे. मात्र पक्षांकडून निवडले जाणारे उमेदवार खरोखरच परफेक्ट निघणार काय? याबाबतही नागरिकांत चर्चा सुरू आहेत.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचाही समावेश होत असून येत्या १८ डिसेंबर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
या निवडणुका कुठल्याची राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाही; परंतु, राजकीय पक्षांकडून ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी पॅनल तयार करून निवडणूक लढविली जाते.
त्यात १५ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आले आहे. शिवाय सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने राजकीय पक्षांकडून जास्त रस घेतला जात आहे.
निवडणुकीला जरी वेळ असला तरी आतापासूनच गावागावांत राजकीय वातावरण तापू लागले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आल्याने तरुण वर्गसुद्धा आता सक्रिय झाला असून निवडणुकीला चांगलीच रंगत येत आहे.
शिवाय, कोणताही पक्ष असो राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासूनच होत असल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
म्हणूनच त्यांनाही आता परफेक्ट उमेदवाराची गरज असून ते शोध घेत आहेत. तर दुसरीकडे इच्छुकांकडूनही तयारी सुरू झाली असून भेटीगाठी व जनसंपर्कावर भर दिला जात आहे.
काहीही करून जास्तीत जास्त ग्रामपंचायत काबिज करावयाच्या असल्याने नेते मंडळींकडूनही विविध फंडे आजमाविले जात आहेत.
यासाठी समविचार पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेत निवडणुका लढण्याचे, बैठका घेऊन योग्य नियोजन करण्याचे फंडे अवलंबिले जात आहेत.
कागदपत्रांची जुळवाजुळव
निवडणूक लढवित असताना त्यासाठी आरक्षण किंवा खुले गट अशात विविध कागदपत्रांची गरज असते. यामधील एखादेही कागद सुटू नये,
यासाठी इच्छुकांकडून आतापासूनच तयारी सुरू आहे. यासाठी ते संबंधित पक्ष तसेच अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेत कागपदत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी भिडून आहेत.
कार्यकर्ता व मतदारांची आवभगत
निवडणुकीत कार्यकर्ता व मतदार या दोघांनाच विशेष महत्त्व असते. यामुळेच इच्छुकांकडून आतापासून आपल्या कार्यकर्ता व मतदारांचे आवभगत सुरू झाल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, यासाठी पार्ट्यांना सुरुवात झाली असून नॉनव्हेजसोबत शौकिनांसाठी दारूचीही व्यवस्था केली जात आहे. कार्यकर्ता तसेच मतदार नाराज झाले नाही पाहिजे, याची खबरदारी घेतली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज