मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पिण्यासाठीच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत ५.५० टीएमसीचे दुसरे आवर्तन तर ६.५० टीएमसीचे तिसरे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजुरी दिली.
दरम्यान, हेच पाणी पुढे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज-चिंचपूर बंधाऱ्यात येईल. फेब्रुवारीअखेर सुटणारे पाणी सोलापूर शहरासाठीचे दुसरे आवर्तन असणार आहे. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात आणखी एकदा सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाईल.
नियोजन भवन समितीच्या सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठक पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. एस. खांडेकर, कार्यकारी अभियंता धीरज साळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपअभियंता कैलास चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे श्री. खांडेकर म्हणाले, उजनी धरणात २९ जानेवारी २०२५ रोजी उपयुक्त पाणीसाठा ४०. ५९ टीएमसी असून अचल पाणीसाठा ६३.६६ टीएमसी आहे तर एकूण पाणीसाठा १०४.२५ टीएमसी इतका असल्याचे सांगितले.
तसेच सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सहा टीएमसी पाणी आवर्तन यापूर्वी सोडलेले असून या पाणीपुरवठा योजनेसाठी पिण्याच्या पाण्याचे दोन आकस्मिक आरक्षण देणे शक्य आहे.
सोलापूर शहर व भीमा नदी काठावरील इतर पाणीपुरवठा योजनेसाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडणे आवश्यक होते.
परंतु पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीची बैठक घेता आली नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री यांची मान्यता घेऊन भीमा नदीचे पहिले आवर्तन पूर्ण केल्याची माहिती खांडेकर यांनी दिली.
पुढील नियोजित वेळेनुसार समितीने दिलेल्या मान्यतेप्रमाणे दुसरे व तिसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीसाठी मार्चअखेर दुसरे आवर्तन
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ४ जानेवारीपासून सोडलेले पाणी आता ८ ते ९ फेब्रुवारीपर्यंत बंद केले जाणार आहे.
त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्चअखेर दुसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आर्वतन सोडले जाईल.
उजनीतील पाणीसाठ्याची सद्यःस्थिती
उपयुक्त पाणीसाठा : ४०. ५९ टीएमसी, अचल पाणीसाठ ६३.६६ टीएमसी, एकूण पाणीसाठा , १०४.२५ टीएमसी, टक्केवारी ७४.९७
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज