टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यात उजनी प्रकल्पाच्या जमिनी हडप करण्यासाठी डमी व्यक्ती आणि बनावट आधार कार्डांचा वापर करून झालेल्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या क्षेत्रातील अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.

उजनी पुनर्वसनाच्या अनेक जमिनींची खरेदी-विक्री संशयास्पद आणि बोगस पद्धतीने झाल्याची चर्चा असून, यात मध्यस्थी करणारे एजंट मात्र ‘मालामाल’ झाले आहेत. या संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

एजंट झाले गब्बर; शेतकऱ्यांची फसवणूक
उजनी धरणासाठी जमिनी दिलेल्या अनेक वृद्ध, अशिक्षित किंवा परगावी राहणाऱ्या शेतकऱ्यांना टार्गेट करून हे रॅकेट चालवले गेल्याचा संशय व्यक्त होत आहे.

बोगस खरेदीचा सुळसुळाट: केवळ एक-दोन प्रकरणांपुरतेच हे मर्यादित नसून, पुनर्वसनाच्या नावाखाली अनेक बोगस खरेदीखते झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एजंट धार्जिणे राजकारण: शासनाकडून मिळणाऱ्या जमिनींवर डोळा ठेवून काही स्थानिक एजंट आणि दलालांनी यात कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे.

कार्यालयांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात: दुय्यम निबंधक कार्यालयात डोळे झाकून झालेली ही खरेदी पाहता, यात मोठे साटेलोटे असण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
…तर अनेक ‘बडे मासे’ गळाला लागणार
मंगळवेढ्यात नुकत्याच दाखल झालेल्या १० लाख २० हजारांच्या जमीन फसवणूक गुन्ह्यामुळे केवळ हिमनगाचे एक टोक समोर आले आहे. जर या संपूर्ण प्रकरणाची ‘स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम’ (SIT) किंवा महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी झाली, तर तालुक्यातील उजनी पुनर्वसन जमीन घोटाळ्यातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जनतेची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
उजनीच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांनी आयुष्य घालवले. आज त्यांच्याच जमिनी डमी माणसे उभी करून हडपल्या जात असतील तर ही गंभीर बाब आहे. मंगळवेढा परिसरातील गेल्या काही वर्षांतील सर्व संशयास्पद पुनर्वसन जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी झालीच पाहिजे

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












