टीम मंगळवेढा टाईम्स।
कॉंग्रेस तालुकाध्यक्ष आणि तालुका शहर निवडी थांबविण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या बैठक होईपर्यंत कोणालाही पत्रे देऊ नका,
असा निरोप जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांना दिल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी सांगितले असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.
जिल्हा काँग्रेसमध्ये शिंदे गट विरुध्द मोहिते-पाटील गट वाद शिगेला पोहोचला आहे. संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेनुसार सोलापूर जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्ष निवडण्यात आले आहेत. मात्र काही ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीवर चर्चा करणे आवश्यक असल्याचा निरोप सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून आला.
त्यानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या ब्लॉक अध्यक्षांना नियुक्तीचे पत्रे देऊ नका, असा निरोप दिला. हा निरोप धवलसिंहांना कळविला आहे, असे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी सांगितले.
पंढरपूरचे हणुमंत मोरे, अमर सूर्यवंशी रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटायला आले होते. शिंदे यांनी दोघांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी तात्पुरत्या स्थगित आहे. तुम्ही पक्षाचे काम करा, असा निरोप यावेळी देण्यात आल्याची चर्चा काँग्रेस भवनात होती.
मंगळवेढा, मोहोळ अन् माळशिरसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता आक्षेप
प्रदेश काँग्रेस कमिटीचे निवडणूक निर्णय अधिका पल्लम राजू यांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील १५ ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या.
जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांना या १५ ब्लॉकची नियुक्तीपत्रे द्यावीत, असे पत्र प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिले होते. दरम्यान, मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस तालुक्यातील काँग्रेसच्या जुन्या पदाधिकायांनी या निवडीला आक्षेप घेतला.
सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांना विश्वासात न घेता या निवडी झाल्याचा आरोप केला.
ज्यांनी कॉंग्रेस सदस्यता नोंदणीत उत्तम काम केले. त्यांना मेरिटनुसार ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे मोहिते-पाटील यांचे म्हणणे होते.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तक्रार करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना झापल्याचे वृत्त होते. मात्र या निवडींना तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.
नियुक्ती जाहीर झालेले मात्र पत्रांच्या प्रतीक्षेत असलेले ब्लॉक अध्यक्ष
अक्कलकोट ग्रामीण शंकर म्हेत्रे, दक्षिण सोलापूर – हरीश पाटील, उत्तर सोलापूर शालीवहन देशमुख, मंगळवेढा – प्रशांत साळे, मोहोळ – सुलेमान तांबोळी, बार्शी ग्रामीण सतीश पाचकवडे, बार्शी शहर विजय साळुंखे, माढा ऋषिकेश बोबडे, पंढरपूर ग्रामीण हणुमंत मोरे, पंढरपूर शहर अमर सूर्यवंशी, सांगोला अभिषेक कोबळे, माळशिरस सतीश पालकर, करमाळा प्रतापराव जगताप, वैराग-राहुल खरात, कुईवाडी– फिरोज खान,
प्रदेश कमिटीच्या निरोपानुसार नियुक्तीपत्रे थांबविली
काँग्रेस सभासद नोंदणी, भारत जोडोमध्ये उत्तम काम केलेल्या कार्यकत्यांची ब्लॉक अध्यक्षपदी निवड झाली आहे. मेरीट हा निकष राहिला आहे. प्रदेश कमिटीच्या निरोपानुसार नियुक्तीपत्रे थांबविली आहे. प्रदेश पातळीवरून निरोप आल्यानंतरच पत्रे देऊ. -धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस (स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज