टीम मंगळवेढा टाईम्स । वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक रक्कम भरण्यासाठी आरटीओ कडे ‘ई-चलन मशिन’उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारा वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा नियमभंग केला आहे, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मशिनद्वारे थेट केलेल्या कारवाईअंतर्गत दंडाची पावती थेट वाहनचालकाच्या मोबाइलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली जात असल्याने वाहनचालकांची गैरसोय दूर झाली आहे.
दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ च्या दोन भरारी पथकाकडून आठ दिवसात ७५ चलनाद्वारे तब्बल ५ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती मोटार वाहन निरीक्षक तानाजीराव धुमाळ यांनी दिली.
रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने १ सप्टेंबर पासून नवीन मोटार वाहन कायदा लागू करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर आरटीओकडून दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जिह्यात दोन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यानुसार बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.भरारी पथकातील मोटार वाहन निरीक्षक तानाजीराव धुमाळ, मोटार वाहन निरिक्षक आशिष पाराशर ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुहास ठोंबरे यांनी कारवाई ची मोहीम तीव्र केली आहे.
या आठ दिवसात तब्बल ५ लाख ६७ हजार रुपये ई चलनाद्वारे दंड वसूल करण्यात आला आहे.
नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून या ई चलन मशिनद्वारे दंडाची रक्कम आकारण्यात येत आहे. ती भरल्यानंतर त्याला लगेच पावती देण्यात येते. दंड वसूल करण्याचे ठिकाणही या मशीनमध्ये नमूद होते.वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ऑनलाइन कारवाई करणे, वाहनाचे छायाचित्र काढून त्याचा पुरावा म्हणून वापर करणे, दंड कपातीची माहिती वाहनचालकाच्या मोबाइलवर एसएमसद्वारे पाठविणे, दंड जागेवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरता यावा म्हणून स्वाइप मशिन्स, पेंडिंग दंडाबाबत वाहनचालकाला ऑनलाइन पेमेंट सुविधा, कार्यालयात येऊन दंड भरण्याची सुविधा आहे.
तसेच वाहनचालकाची सर्व माहिती ई-चलनामुळे आरटीओ कडे राहणार आहे. कारवाई दरम्यान वाहनचालक पसार झाला, तर त्याचा वाहन क्रमांक, मोबाइल क्रमांक घेऊन चलन करून तर थेट वाहनमालकाला कारवाईबाबत मेसेज जाईल.
त्यानंतर मालकाला दंड भरावा लागेल. एकदा केलेले चलन कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही. वाहनचालक, मालकांना दंड न भरल्यास त्यांच्या नावावर दंड न भरलेली रक्कम दिसेल. पुढील कारवाईच्या वेळेस पकडल्यानंतर जुन्या दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर वाहन सोडून दिले जाणार आहे.
एका शहरात केलेला दंड, दुसऱ्या शहरातही वसूल करता येणार आहे अशी माहिती मोटार वाहन निरीक्षक तानाजीराव धुमाळ यांनी दिली.
वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवीन मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर वेळीच सावध राहा अन्यथा तुम्हाला आरटीओ च्या कारवाईला सामोरं जावे लागणार आहे.
नव्या कायद्यानुसार गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक , विना इन्शुरन्स गाडी चालवणे, मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत दहापट दंड आकारण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना दंडाची रक्कम भरण्यास सोलापूर येथील कार्यालयात जाण्याची गरज नाही ते संबंधित आरटीओ कडे असणाऱ्या ई चलन मशीनवर भरू शकतात.
घरबसल्या मिळणार माहिती
अनेकांना माहितीही नसेल की, त्यांच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे. त्यामुळे आता ही माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईल इंटरनेटवरून मिळवू शकता. डिजिटल इंडियामुळे अनेक सरकारी कामे ऑनलाइन होत आहे. त्यामुळे याबाबतच्या समस्या आणि तक्रारीचं निवारण करण्यासाठी आरटीओची अधिकृत वेबसाईट आहे.
यामध्ये echallan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमच्या वाहनावर किती दंड जमा आहे हे तपासू शकता. वाहन नोंदणीवेळी तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर याचे मॅसेज येत असतात.
नियमभंग करणाऱ्या वाहनांच्या रेकॉर्ड ची होणार तपासणी
ई-चलन मशिन’वर नियमभंगाची माहिती साठवली जाणार आहे. त्यामुळे एखादा वाहनचालक नियमभंग करताना आढळल्यानंतर त्याचे रेकॉर्ड तपासले जाणार. पूर्वी ची दंडाची रक्कम भरून घेतली जाणार आहे. वाहन चालकाकडे एटीएम कार्ड असल्यास त्यावरून स्वॅप करून रक्कम घेतली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना दंड भरण्यासाठी आता सोलापूर येथील कार्यालयाकडे जाण्याची गरज नाही. आरटीओ कडे ‘ई-चलन मशिन’उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून एटीएम कार्ड व ऑनलाइन च्या माध्यमातून दंडाची रक्कम भरण्यात येणार आहे त्याची पावती ही जाग्यावर दिली जाणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन भरारी पथकानी आठ दिवसात ७५ ई चलनाद्वारे ५ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तानाजीराव धुमाळ, मोटार वाहन निरीक्षक सोलापूर
RTO fines can now be paid through e-challan; No need to go to the office to pay the fine anymore
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज