टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकसभा निवडणुकीसाठी ‘चारशे पार’चा अतिआत्मविश्वासात दिलेला नारा चांगलाच अंगलट आल्यानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीसाठी सावध पावले टाकत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, इतर मंत्री, दिग्गज नेतेमंडळी यांच्यासह भाजपने महाराष्ट्रावर च पूर्ण फोकस ठेवला आहे.
दौरे, विकासकामांचं भूमिपूजन, मेळावे, बैठका यांच्यासह महायुती आणि भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरत असल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडीला धोबीपछाड देण्यासाठी महायुतीने विधानसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. पण याचवेळी आता भाजपसाठी एक धोक्याची घंटा समोर आली आहे असे वृत्त सरकारनामा या पोर्टलने दिले आहे.
भाजप महाराष्ट्रात 2014 ला 122 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2019 ला 17 जागांवर फटका बसल्यामुळे भाजप 105 आमदारांवरच थांबला.
आता 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या 105 पैकी तब्बल 25 जागा डेंजर झोन’मध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे मराठा फॅक्टरने लोकसभेला फटका बसलेल्या भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
विशेष म्हणजे या 25 जागांमध्ये दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे. त्यामुळे आता 25 जागा वाचवण्यासाठी भाजपला चांगलीच ताकद लावावी लागणार आहे. या जागा जिंकण्यासाठी भाजपकडून विशेष प्लॅनिंग सुरू असल्याचेही बोलले जात आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून खलबतं सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता भाजपच्या मदतीला पुन्हा एकदा आरएसएस धावून आली आहे.
भाजप नेत्यांच्या बैठकीत 85 जागा आपण जिंकणार असल्याचा दावा वरिष्ठ नेतेमंडळी यांनी केला होता.यात काही नवीन मतदारसंघांचाही समावेश आहे. पण आता 25 जागा धोक्यात असल्याची माहिती समोर आल्याने भाजप नेतृत्वाची चिंता चांगलीच वाढली आहे.
भाजप हा पक्ष नेहमीच मास्टर प्लॅनिंगसाठी ओळखला जातो. बारीक सारीक मुद्द्यांवरही हा पक्ष जबरदस्त काम करतो. त्यामुळे धोक्यात असलेल्या जागांसाठी भाजपने आपलं नियोजन सुरू केलं आहे.
मागच्या वेळी ज्या जागांवर निसटता विजय , आणि पराभव झाला होता असे मतदारसंघ भाजपने टार्गेट केले आहे. तर अशा 15 ते 16 जागा जिंकून आणण्याची भाजपची रणनीती आहे.
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. यातील 125 जागांचं मिशन भाजपने विधानसभेत ठेवले आहे.
हे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने प्लॅन ठरवला आहे. राज्यातील जवळपास 50 जागांवर भाजपचा (BJP) विजय निश्चित मानला जात आहे.
दुसरीकडे उर्वरित 75 जागांवर निवडून येण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी भाजपने वेगळे प्लॅनिंग राबवले आहे, विजय मिळवू शकतो, अशा 75 विधानसभा मतदारसंघावर भर दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 125 जागा भाजपने जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे. तर, 75 जागांची जबाबदारी भाजप नेत्यांना वाटून देण्यात आली आहे.
भाजपला 125 जागांवर विजय मिळवण्यासाठी 150 पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढावी लागणार आहे. त्यामुळे भाजप 160 जागांवर लढणार या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज