मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
खरं म्हणजे वारकरी हेच ‘व्हीआयपी’ आहेत. आम्ही सगळे राजकारणी त्यांच्याच जिवावर आहोत. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक, अध्यात्मीक अधिष्ठान केव्हाही वर आहे, हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आज आम्ही या ठिकाणी कोणते मंत्री नाही, तर वारकरी म्हणून या ठिकाणी आलो आहोत.
वारी स्वच्छ, सुरक्षित, निर्मल झाली पाहिजे. एकाही वारकऱ्याला त्रास होता कामा नये. त्यांच्या जिवाची, सुरक्षिततेची काळजी घेण्याची सरकारची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा ६ जुलैला साजरा होत आहे. तत्पूर्वी, या संपूर्ण सोहळ्याच्या नियोजनाची, वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची पाहणी करून आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे काल गुरुवारी येथे आले होते. पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, मंगेश चिवटे आदी उपस्थित होते. प्रारंभी आमदार राजू खरे, आ. समाधान आवताडे, माजी आ. शहाजी पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, चरणराज चवरे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने, भक्तिभावाने पंढरीच्या वारीला येतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात. आलेले सर्व वारकरी सुखरूप परत घरी गेले पाहिजेत, वासाठी यात्रेचे चोख नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गेल्या वर्षीपासून मी या ठिकाणी येऊन स्वतः नियोजनाचा आढावा घेत आहे.
यावर्षी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख असतील सगळ्यांनी तंतोतंत नियोजन केलेले दिसून आले आहे. मंदिरात दर्शनाचे नियोजन सुद्धा चांगले झाले आहे. त्यामुळे मी पण नियम पाळून वाहन न आणता पायी चालत मंदिरात आलो.
पदस्पर्श दर्शनाची रांग न थांबवता मुख दर्शन घेतले. यंदाची वारी मोठी आहे. सगळी व्यवस्था चांगली असल्याने वारकरी खूष आहेत. याचे सगळे श्रेय प्रशासकीय यंत्रणेला आहे.
दरम्यान, समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ना. शिंदे यांनी मंदिरात झालेल्या विविध कामांची आवर्जुन पाहणी केली. दर्शन रांगेतील वारकऱ्यांशी थेट संवाद साधत सोयी सुविधांविषयी विचारपूस केली.
मंदिरापासून परत चालत चौफाळापर्यंत येताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हात जोडून सर्वांना नमन केले. त्यानंतर त्यांनी आ. समाधान आवताडे यांच्या पाठीमागे बुलेटवर बसून ६५ एकर तळ, चंद्रभागा वाळवंटात, पत्राशेड, दर्शन रांग या ठिकाणी फिरून पाहणी केली. स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधांची स्वतः पाहणी केली. थेट रांगेतील वारकऱ्यांशी संवाद साधला.
‘माऊली माऊली’ अशी साद घालत पाऊस पाण्यापासून पंढरपुरातील सोयी सुविधांपर्यंत माहिती जाणून घेतली. या आपुलकीने वारकरी अगदी भारावून गेल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
‘रोड शो’ अन् सेल्फीसाठी झुंबड
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आ. राजू खरे, आ. समाधान आवताडे यांच्यासह मंदिरापासून चौफाळाकडे येत असताना वारकरी तसेच इमारतींवर थांबलेल्या स्थानिकांना हात उंचावून दाद देत होते. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी, दूरवरून का होईना त्यांच्यासह मोबाईलमध्ये ‘सेल्फी’ घेण्यासाठी वारकरी, कार्यकर्त्यांची प्रचंड झुंबड उडाली.
त्यामुळे इतर मंत्री, अधिकाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले. अक्षरशः ढकलाढकली सुरू झाली. त्यानंतर ना. शिंदे यांनी स्वतः च्या वाहनात उभा राहून ‘रोड शो’ केला. प्रचंड उत्साहात सर्वांनी त्यांना प्रतिसाद दिला.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज