टीम मंगळवेढा टाईम्स ।
जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्कात घट केल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घट चालू आहे.या कारणामुळे बुधवारी सोने आणि चांदीचे दर कोसळले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 232 रुपयांनी कमी होऊन 47,387 अंकांवर बंद झाला तर चांदीचा दर 1,955 रुपयांनी कमी होऊन 67,605 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,835 रुपये डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 26.78 डॉलर प्रति औंस झाला.
अमेरिकेने जाहीर केलेले पॅकेज प्रत्यक्षात अंमलात येण्यास उशीर होत आहे. त्याचबरोबर लसीकरणाला बराच काळ लागत असल्यामुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीतील नफा काढून घेत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे सांगितले जाते.
भारतात सोन्यावर साडेबारा टक्के एवढे सीमाशुल्क होते. त्यामुळे स्मगलिंग आणि इतर गैरप्रकार होत होते. ते कमी करण्यासाठी भारताने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी कमी केले आहे.
मात्र भारतात सोन्यावर कृषी पायाभूत सुविधासाठी अडीच टक्क्यांचा अधिभार लावला आहे.
त्यामुळे सोन्यावर एकूण 10 टक्के एवढे शुल्क पडते. मात्र पूर्वीच्या शुल्काच्या प्रमाणात घट झाल्यामुळे भारतात सोने स्वस्त होत आहे. सोन्याचे दर 50 हजार रुपयांपेक्षा कमी पातळीवर असल्यावर सोने खरेदी केल्यास दीर्घ पल्ल्यात नफा होऊ शकतो, असे बरेच विश्लेषक सुचवीत आहेत.
चांदीची तीन हजारापर्यंत घसरण…
३ फेब्रुवारी रोजी चांदी तीन हजार रुपयांनी घसरुन ७० हजार रुपयांवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ४८ हजार ९०० रुपयांवर आले.
केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने त्याचे भाव कमी-कमी होत असल्याचे तीन दिवसांपासून चित्र आहे. पहिल्या दिवशी एक हजार रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात मंगळवार, २ रोजी एक हजार ५०० रुपयांनी घसरण झाली.
त्यानंतर बुधवार, ३ रोजी ही घसरण आणखी वाढून थेट तीन हजार रुपयांनी चांदीचे भाव कमी झाले व ती थेट ७० हजार रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे सोन्याच्या भावात पहिल्या दिवशी ५०० रुपयांनी व दुसऱ्या दिवशी मंगळवारी ४०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर बुधवार, ३ रोजी पुन्हा ६०० रुपयांनी घसरण होऊन सोने थेट ४८ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले. अर्थसंकल्पाच्या दिवशी दरातील चढउतार कायम होते.
स्थानिक कंपन्यांना वाव मिळण्याची शक्यता
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी केलेल्या तरतुदींमुळे तसेच बहुतांश घटकांवर आयात शुल्काचा भार वाढल्याने स्थानिक कंपन्यांना वाव मिळणार असल्याच्या शक्यतेने शेअर बाजारात उसळी सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सराफ बाजारात घसरण सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज