टीम मंगळवेढा टाईम्स।
घरातील वैयक्तिक कामासाठी बँकेतून काढलेले ५ लाख रुपयांची प्लास्टिक पिशवी दुचाकीच्या टाकीवर ठेवून परत घरी जात असताना समोरून येणाऱ्या दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी पिशवीला हिसका देऊन रक्कम पळवली.
ही घटना दि.७ डिसेंबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास शहरातील भूमिअभिलेख कार्यालय समोरील रोडवर घडली आहे. याप्रकरणी संतोष केरू जाधव (रा.जाधव मळा, एखतपूर रोड, सांगोला) यांनी सांगोला पोलीसात अनोळखी दोघांविरोधात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी संतोष जाधव यांच्या घराचे काम चालू असल्याने त्यांनी ७ डिसेंबर रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील वाढेगाव नाका येथील एस.बी.आय. बँकेतील त्यांच्या खात्यावरून ५ लाख रुपये काढले होते.
सदरचे पैसे प्लास्टिक पिशवीत गुंडाळून दुचाकीच्या टाकीवर ठेवून घराकडे निघाले होते. घराकडे जात असताना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तहसिल कार्यालय नजीकच्या भूमी अभिलेख कार्यालया समोरील रोडवरील वळणावर आले,
यावेळी वाहनांची गर्दी असल्याने इतर वाहने थांबली होती. म्हणून फिर्यादी यांनी दुचाकी थांबवली आणि उजवा हात दुचाकीच्या टाकीवर ठेवलेल्या रक्कमेच्या पिशवीवर ठेवलेला होता.
त्याचवेळी तेथे समोरून एका दुचाकीवर दोन इसम फिर्यादी यांच्या दुचाकी जवळ आले, त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने फिर्यादी यांच्या दुचाकीवरील टाकीवर ठेवलेली ५ लाख रूपयांची पिशवी हिसका देऊन घेतली आणि चोरून घेऊन वाढेगाव नाक्याकडे दुचाकीवर पळून गेले.
दुचाकीवरील चालकाने हेल्मेट घातलेले होते व पाठीमागे बसलेल्या इसमाने फुल पांढरा टी-शर्ट व हाफ बरमुडा घातलेला होता. फिर्यादी यांनी त्या दुचाकीवरील चोरट्यांचा शहरातील वाढेगाव नाक्यापर्यंत पाठलाग केला.
परंतु सदर ठिकाणहून अनोळखी चोर धुम स्टाईलने पसार झाले. याबाबत जाधव यांनी दोन दोन अनोळखी चोराविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज