मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । वृत्तपत्रात वाळू चोरीच्या बातम्या का लावतो, आम्ही अकोला ता सांगोला हद्दीतील माण नदीपात्रातून वाळू उपसा करतो तू दिलेल्या बातम्यांमुळे आमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते असे म्हणत पाच जणांनी पत्रकार संजय बाबर यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून जखमी केले. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी वासुद चौक सांगोला येथे घडली. या घटनेमुळे वाळुमाफियांची समाजात असलेली दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी पत्रकार संजय बाबर हे 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास वासुद चौकातील प्रेमाचा चहा या ठिकाणी सतीश गायकवाड, राहुल ढोले यांच्यासमवेत चहा पित बसले होते. त्यावेळी दीपक उर्फ गुंडा खटकाळे, दिनेश खटकाळे, स्वप्नील बाबर, अतुल गायकवाड, अजित उर्फ दादासाहेब मिसाळ हे त्या ठिकाणी आले. यावेळी दीपक खटकाळे व दिनेश खटकाळे यांनी पत्रकार संजय बाबर यांना तू वृत्तपत्रात वाळू चोरीच्या बातम्या का लावतो, तू दिलेल्या बातम्यांमुळे आमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते असे म्हणत शिवीगाळ दमदाटी करत बेल्ट व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आमच्यावर पोलीस ठाण्यात अनेक केसेस दाखल आहेत, पोलीस आमचे काहीही करू शकत नाहीत, तू पोलिसात तक्रार केली तर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही अशी दोघांनी धमकी दिली. यावेळी झालेल्या मारहाणीत संजय बाबर यांच्या हातातील 33 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी गहाळ झाली.
याबाबत संजय बाबर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दीपक उर्फ गुंडा खटकाळे, दिनेश खटकाळे, स्वप्नील बाबर, अतुल गायकवाड, अजित उर्फ दादासाहेब मिसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास स.पो.नि हुले करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज