मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार इंग्लिश स्कूल आंबे चिंचोलीचे मुख्याध्यापक अजित शिंदे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ठेकेदार उमेश मासाळ, उद्योजक नामदेव पवार, शाम पवार, आबासाहेब होनमाने, राजकुमार माने सर, अर्जुन गवळी, विजय निकम आदीजन उपस्थित होते.

अजित धोंडीराम शिंदे यांनी आजवर केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
प्रगती, ऊर्जा, समृद्धी आणि सकारात्मकता ओतप्रोत भरलेले नेतृत्व अंगी असलेले या सूर्योदय ग्रुपचे अनिलजी इंगवले यांनी काही मित्रांना सोबत घेऊन विविध क्षेत्रांमध्ये विशेषतः बँकिंग क्षेत्रामध्ये गुणवत्ता, सेवा आणि विश्वास याचा सुरेख संगम साधत सर्वांच्या साथीने कर्तृत्वाचे सर्वोत्तम साम्राज्य उभे केले. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील सर्वोत्तम गुणवत्ता जपणारा परिवार हीच या सूर्योदय ग्रुपची विशेष ओळख असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आणि इतिहास अभ्यासक प्रा नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.

जगामध्ये क्रांतीचे आणि कर्तुत्वाचे बीज केवळ शिक्षकच पेरू शकतो असे सांगत आणि डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन, परमपूज्य साने गुरुजी सारख्या अनेक गुरुजनांचे प्रेरणादायी दाखले देत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात सुद्धा पाठीवर शाबासकीची थाप टाकून स्वतःच्या आदर्श कृती मधून विद्यार्थी घडवणाऱ्या गुरुजनांचे अनमोल महत्त्व अधोरेखित केले. अशा गुरुजनांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर सन्मान सोहळा आयोजित करून या सूर्योदय परिवाराने नावाप्रमाणेच सर्व क्षेत्रातील आपली व्यापकता सिद्ध केली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्कच्या जीवनशैलीचे अप्रतिम वर्णन करत यासारख्या कितीतरी कर्तृत्वसंपन्न विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या गुरुजनांचे विशेष कौतुक करत उपस्थितांना सुमारे दीड तास मंत्रमुग्ध केले.

यावेळी मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आणि उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरणभैय्या पाटील यांनी बोलताना शिक्षण आणि सहकार ही व्यवस्था समाजासाठी उपयुक्त असून सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून या ग्रुपने उभे केलेले उत्तुंग कार्य आमच्यासाठी देखील प्रेरणादायी आहे. हीच प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या मराठवाड्यात विशेषतः लातूर धाराशिव भागात देखील असे कार्य उभे करू असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

सुरुवातीला सूर्योदय समूहातील सर्व संस्थांचे संस्थापक आणि एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी प्रास्ताविकामध्ये एल के पी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन या संस्थांच्या भक्कम आर्थिक प्रगतीचा लेखाजोगा मांडत सूर्योदयच्या अनेक सामाजिक उपक्रमांचा उल्लेख केला.
शिक्षक दिन कार्यक्रमासारखे विविध प्रकारचे सन्मान सोहळे, व्यापक स्वरूपातील रक्तदान शिबिरे, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, वृक्ष संगोपन मोहीम, ग्रामीण भागातील महिलांचे तीर्थयात्रा दर्शन कार्यक्रम अशा अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे आजवर हजारो माणसे सूर्योदयने जोडली असून सूर्योदय मॉल, दूध विभाग आणि सूर्योदय अर्बन व एलकेपी मल्टीस्टेट सारख्या वित्तीय संस्था ग्राहकांचा विश्वास जपत समर्थपणे आपल्या सेवेत आहेत.
असे सांगत सूर्योदयच्या या सर्व आर्थिक संस्था आणि उद्योगांवर आपणां सारख्या गुरुजनांच्या आशीर्वादाची छत्रछाया कायम राहावी अशा भावना व्यक्त केल्या. सूर्योदय परिवाराच्या वतीने सांगोल्यात दरवर्षी व्यापक स्वरूपात ‘शिक्षक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
याही वर्षी सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ या चार तालुक्यातील काही गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परमपूज्य राजमाता अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन सांगोला येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षक दिन’ सोहळ्यासाठी शिक्षक, शिक्षिका यांच्यासह उपस्थितांची प्रचंड गर्दी झाली होती.
सूर्योदय परिवारावरील प्रेम आणि कार्यक्रमांचा नेहमीचा उंच दर्जा यामुळे जमलेल्या सारस्वतांच्या अलोट गर्दीमुळे आयोजकांचे अंदाज चुकवत सभागृह अक्षरशः थिटे पडले. सर्व उपस्थितांसाठी उत्कृष्ट स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. कोणत्याही प्रस्तावाशिवाय परस्पर मूल्यमापन करून जाहीर झालेले पुरस्कार, सूर्योदयच्या स्टाफ कडून वेळोवेळी आस्थेने केली जात असलेली विचारपूस, उत्कृष्ट वक्ते आणि कार्यक्रमाची भव्यता यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय झाला असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवल्या.
या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते जयसिंगतात्या पाटील, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ भगत गुरुजी, सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतनचे सुभाष दिघे गुरुजी, पंढरपूरचे उपसभापती देशमुख साहेब, उद्योजक अरविंदभाऊ केदार, सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ अर्चनाताई इंगवले, व्हॉ. चेअरमन सौ ज्योतीताई भगत, संचालिका सौ मीनाक्षीताई दिघे, सौ सुरेखाताई लवटे, संचालक महादेव दिघे सर, उमरग्याचे माजी सभापती सचिन पाटील त्याचबरोबर सूर्योदय सांस्कृतिक परिवाराचे संचालक प्रशांत पाटील, सुभाष अनुसे, महेश नष्टे, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष इंगवले, मोहन इंगवले, अण्णासाहेब इंगवले, एलकेपी मल्टीस्टेट सीइओ राजकुमार बहिरे, सूर्योदयचे अजित दिघे, रिजनल मॅनेजर शशिकांत पाटील सागर काशीद, एरिया मॅनेजर अमोल कांबळे, अविनाश खुळे क्लस्टर हेड काझी साहेब यांचेसह सूर्योदय समूहातील कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












