टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी) :
हजारो ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराची कमाई विश्वासाने धनश्री परिवारातील संस्थांकडे सोपविली आहे. हा विश्वास केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित नसून ती आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे सत्य, प्रामाणिकपणा आणि परिश्रमांच्या बळावर हा विश्वास अधिक दृढ करत धनश्री परिवाराला सहकार क्षेत्रातील विश्वासाचा ब्रँड म्हणून आणखी पुढे नेण्याचा संकल्प गणेशोत्सव आगमनाच्या शुभ मुहूर्तावर करूया, असे प्रतिपादन धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे यांनी केले.

देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना मार्केट यार्ड, मंगळवेढा येथील धनश्री परिवाराच्या प्रशासकीय कार्यालयात धनश्री महिला पतसंस्था, धनश्री मल्टीस्टेट व सदगुरु सिताराम महाराज अर्बन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली.

धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सुरुवातीला गणरायाची प्रतिष्ठापना करत पुष्पहार अर्पण करून ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य रामचंद्र चेळेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

प्रा. शोभाताई काळुंगे म्हणाल्या, श्री गणेश हा बुद्धीची देवता आहे. चांगल्या बुद्धीचा सदुपयोगाने कर्म करत लोकांचा विश्वास संपादन करणे, हीच खरी गणेशभक्ती आहे. आज धनश्री परिवारातील तिन्ही संस्थांच्या सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

या ठेवी म्हणजे केवळ आकडे नसून हजारो ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे. त्यामुळे हा विश्वास जपणे ही संस्थेतील प्रत्येकाची जबाबदारी आहे.
धनश्री महिला पतसंस्था, धनश्री मल्टीस्टेट आणि सदगुरु सिताराम महाराज अर्बन सोसायटीच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहोचता आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी माणसे जोडताना जपलेला विश्वास हा स्वराज्याचा पाया होता; त्याच विश्वासाच्या सूत्राला केंद्रस्थानी ठेवून ठेवीदारांच्या कष्टाची कमाई जपणे आणि लोकहिताला प्राधान्य देणे, हीच धनश्री परिवाराची कार्यसंस्कृती आहे.

हा विश्वास कायम ठेवण्यात कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. संत कबीर यांच्या विचारांचा दाखला देताना त्या म्हणाल्या, साँच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप म्हणजे जगात सत्यासारखी दुसरी मोठी तपश्चर्या नाही आणि असत्यासारखे दुसरे मोठे पाप नाही.
धनश्री परिवाराने सत्य आणि विश्वासाची वाटचाल जपली आहे. हीच आमची खरी तपश्चर्या असून ती भविष्यातही कायम ठेवण्यासाठी तत्पर आहोत. मनुष्य हा परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे केवळ कर्मकांडापेक्षा सत्य, प्रामाणिकपणा आणि परिश्रमांच्या विचारांना जीवनात महत्त्व देऊन धनश्री परिवाराची ही वाटचाल सुरू ठेवूया, असे आवाहन करत त्यांनी सर्व उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी आपल्या मनोगतातून धनश्री, सिताराम, आष्टी व कंचेेश्वर परिवाराच्या कामकाजाविषयी माहिती देत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सीताराम अर्बनचे संचालक बबन सरवळे, सीताराम अर्बनचे संचालक संजय चौगुले, धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे, सदगुरु सिताराम महाराज अर्बन सोसायटीचे व्यवस्थापक लक्ष्मण पवार यांच्यासह मान्यवर व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











