टीम मंगळवेढा टाईम्स न्युज। सांगोला
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. याचाच प्रत्यय शनिवारी (११ जुलै) सांगोला तालुक्यातील जवळा येथे आला.
जवळा येथील ‘सोनाई उद्योग समूहा’च्या अजिंक्यराणा दूध संकलन केंद्रावर प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल १५ लाख रुपये किमतीचे ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आणि त्याची जागीच विल्हेवाट लावली. या कारवाईमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायातील काळ्या धंद्यांचे धाबे दणाणले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?
जवळा जवळील बुरंगेवाडी येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘अजिंक्यराणा दूध संकलन केंद्र’ सुरू झाले होते. या केंद्रावरून ‘सोनाई उद्योग समूहा’ला दुधाचा पुरवठा केला जात असे. अत्यंत कमी कालावधीत या केंद्रावर हजारो लिटर दूध जमा होऊ लागल्याने, परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

येथे मोठ्याप्रमाणावर दुधात भेसळ होत असल्याची कुजबुज जवळा परिसरात सुरू होती. अखेर ही खात्रीशीर माहिती अन्न व औषध प्रशासनापर्यंत पोहोचली आणि अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकली.

दुधात भेसळ करण्याचा हा गोरखधंदा परिसरातील संदीप उर्फ गोट्या समाधान गावडे, श्रीकांत समाधान गावडे, विजय शामराव पाटील व इतर मंडळींकडून चालवला जात असल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.

कारवाईत उघड झालेली धक्कादायक बाबी:
शनिवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुरंगेवाडी येथील केंद्रावर अचानक छापा टाकला आणि दुधाचे नमुने तपासले. या तपासणीत अधिकारीही चक्रावून गेले. कारवाईदरम्यान खालील गंभीर बाबी समोर आल्या:

परवान्याचा पत्ताच नाही: या दूध संकलन केंद्राकडे संकलन आणि चिलिंग युनिटचा कोणताही वैध परवाना नव्हता.
SNF चे प्रमाण अत्यंत कमी: जागेवरच केलेल्या चाचणीत दुधातील SNF (Solid Not Fat) चे प्रमाण सरकारी नियमांपेक्षा अत्यंत कमी आढळले, ज्यामुळे भेसळ सिद्ध झाली.
नोंदवहीत सावळागोंधळ: माल कुठून आला, कोणाला विकला, याची कोणतीही पद्धतशीर नोंद केंद्रावर उपलब्ध नव्हती.
नियमांची पायमल्ली: अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या जवळपास सर्वच नियमांचे येथे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले.
अन्नसुरक्षा आयुक्त साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी गणेश कदम आणि अन्नसुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने हा धाडसी छापा टाकला. गुन्हा सिद्ध होताच आरोग्याशी खेळणारे ३७ हजार लिटरहून अधिक दूध नष्ट करण्यात आले.
सांगोला तालुक्यात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने, सामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्भीड कामगिरीचे मनापासून कौतुक केले आहे. “आता तरी दुधातील काळाबाजार थांबणार का?” असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











