टीम मंगळवेढा टाईम्स।
सांगोला शहरातील फॅबटेक कॉलेज वसाहतीत राहणारे व पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असलेल्या ३५ वर्षाच्या ऋचा सूरज रुपनर यांनी राहत्या घरी गुरुवारी सकाळी पावणेसातच्या पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने सांगोला व पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी साळे यांनी एमएलसीद्वारे कळवले की,
डॉ. ऋचा यांनी फॅबटेक कॉलेज वसाहतीत गळफास घेतल्याने सूरज भाऊसाहेब रुपनर यांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे सकाळी पावणेसातच्या सुमारास दाखल केले.
परंतु डॉक्टरांनी ऋचा रुपनर यांना तपासून पाहिले असता त्या उपचारापूर्वीच मृत झाल्या होत्या. त्यावरुन पोलिसांनी अकस्मात मृत दाखल करून पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांच्याकडे पुढील तपास दिला.
सपोनी जगताप यांनी सांगितले की, मृताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात न करता सोलापूर येथे इन कॅमेरा करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे, त्यानुसार शवविच्छेदन सोलापूर येथे करून रात्री आठच्या सुमारास अंत्यविधी पंढरपूर येथे करण्यासाठी नातेवाइकांनी मागणी केली.
त्यानुसार अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येणार आहे. डॉ.ऋचा यांचे पंढरपूर येथे गाडगे महाराज चौकात फॅबटेक हॉस्पिटल आहे.
सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या त्या स्नुषा होत. त्यांचे पती सूरज हे डॉक्टर असून दोघे पती-पत्नी पंढरपूर येथे हॉस्पिटल चालवीत होते. त्यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी झाला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.
डॉ.ऋचा यांनी एवढ्या टोकाची भूमिका का घेतली याबाबत तर्कवितर्क केला जात असून या दुःखद घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज