टीम मंगळवेढा टाईम्स :
खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने दिलेल्या ओढ्यामुळे संकटात सापडलेल्या मंगळवेढा तालुक्यातील बळीराजाला दिवाळीच्या तोंडावर शासनाने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे.

शासनाच्या अग्रीम आर्थिक मदतीचे वितरण मंगळवारपासून सुरू झाले असून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी ५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाइलवर धडकताच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाची तालुक्यात तातडीने अंमलबजावणी करत महसूल प्रशासनाने ६५ हजार ८९० शेतकऱ्यांचा डेटा अनुदान वितरणासाठी यशस्वीरीत्या पोर्टलवर अपलोड केला आहे. या माध्यमातून संपूर्ण तालुक्यासाठी तब्बल ३२ कोटी ९४ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे.

सुट्टीच्या दिवशीही महसूल यंत्रणा कामाला
शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी ही रक्कम मिळावी, यासाठी तहसीलदार मदन जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली. शासकीय सुट्टीचा विचार न करता दोन नायब तहसीलदार, सहा मंडलाधिकारी आणि ४० तलाठ्यांनी कागदपत्रांची पडताळणी, त्रुटींची पूर्तता आणि ऑनलाइन डेटा अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले.

उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ
तालुक्यातील फार्मर आयडी प्रलंबित असलेल्या सुमारे ७ हजार शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांनाही नियमानुसार मदतीची रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

कर्ज खात्यात कपात नको; तहसीलदारांचा बँकांना इशारा
शासनाने दुष्काळी मदत म्हणून दिलेली ही रक्कम बँकांनी थकीत कर्ज किंवा इतर वसुलीपोटी परस्पर वर्ग करू नये, अशा स्पष्ट सूचना तहसीलदार मदन जाधव यांनी दिल्या आहेत. कोणत्याही बँकेने या रकमेतून परस्पर कपात केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

“दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही अविरत काम करून ६५ हजार ८९० शेतकऱ्यांचा डेटा अपलोड केला. मंगळवारपासून ही रक्कम खात्यावर जमा होत असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा तत्पर आहे.”— मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











