टीम मंगळवेढा टाईम्स।
भूसंपादन विभागाकडे कामकाज चालवल्यानंतर फी व खर्चापोटी घेतलेल्या रकमेतील तीन लाख रुपये परत करावेत, यासाठी कार अडवून वकिलावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी चार जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वकिलांवर सातत्याने हल्ले होत असल्याने वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी वकिलांनी काम बंद आंदोलन केले.
श्यामराव लाडे, अक्षय कंडरे, मंगल लाडे व अक्षय याची आई (सर्व रा. सुपली) या चार जणांविरूद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. पंकज हातगिने (रा.जैनवाडी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
सन २०१९ मध्ये यातील श्यामराव लाडे याची शेतजमीन सातारा- पंढरपूर रस्त्यासाठी संपादित झालेली होती. न्यायालयातील काम चालवण्यासाठी लाडे याने अॅड. हातगिने यांना फी मोबदला रक्कम मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते.
त्यानुसार २०२३ मध्ये ५५ लाखांपैकी ४४ लाख जमा झाले. तेव्हा फी व खर्चापोटी अॅड. हातगिने यांच्या खात्यात चेकने चार लाख रुपये जमा केले. मात्र, दोन-तीन दिवसांनी त्याचा नातू अक्षय कंडरे, पत्नी मंगल लाडे हे अॅड. हातगिने यांच्या घरी आले व फी जास्त घेतली असून,
त्यातील १ लाख रुपये ठेवून ३ लाख परत करा, असे म्हणू लागले. तसेच यासाठी दमदाटी करत धमकी देऊन निघून गेले.
सोमवारी दुपारी अॅड. हातगिने हे आपल्या कारने (एमएच १३, ईसी ९९८७) पत्नीसह लहान मुलगा व मुलीला पंढरपुरातील दवाखान्यात घेऊन आले होते. परत घराकडे जात असताना वाखरीतील सीएनजी पंपाजवळ चौघा संशयितांनी अॅड. हातगिने यांची कार अडवून शिवीगाळ केली.
शर्टचा खिसा फाडून २९६० रुपये काढून गेले. मंगल लाडे हिने अॅड. हातगिने यांच्या कारवर पाइपने मारून तीन हजारांचे नुकसान केले. अक्षय याने त्यांच्या दिशेने दगड भिरकावला.
या दरम्यान, सदर संशयित आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने अॅड. हातगिने व त्यांची पत्नी मुले घाबरून गेली.
अखेर यातून सुटका करून घेत अॅड. हातगिने यांनी रात्री उशिरा याबाबतची फिर्याद ग्रामीण पोलिसांत दाखल केली. पुढील तपास हवालदार मारुती दिवसे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज