टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा- पंढरपूर मार्गावर देगाव परिसरात बेकायदा वाळू वाहतूक करणारे डमडम वाळूसह पकडून 2 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी पोलिस शिपाई सोमनाथ माने व अन्य पोलिस कर्मचारी दि.30 च्या रात्री 1.30 वा.पेट्रोलिंग करीत असताना ढेकळेवाडी ते देगाव परिसरातून
मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर एम एच 13,डी.क्यु 2645 हे पांढर्या रंगाचे डमडम पाठीमागील हौदयात 6 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू घेवून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी इशारा करून वाहन उभे केले.
मात्र अंधाराचा फायदा घेवून सदर वाहनाचा चालक व त्याच्यासोबत असलेली अन्य एक व्यक्ती फरार झाली.
पोलिसांनी वाळूसह डमडम असा एकूण 2 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त करून ते डमडम पोलिस स्टेशन आवारात आणून लावले आहे.
सध्या जिल्हयामध्ये कोठेही शासकीय वाळूचा लिलाव नसल्यामुळे व सध्या नदीपात्रात पाणी कमी झाल्यामुळे भिमा नदी व माण नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणात बेकायदा वाळू उपसा करून बांधकामाच्या ठिकाणी भले मोठे वाळूचे ढिगारे नागरिकांच्या निदर्शनास येत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातून होणारी चोरटी वाळू वाहतूक कोणाच्या आशीर्वादामुळे होत आहे कोणाचा वरदहस्त आहे? याचा शोध लागणे गरजेचे आहे.
या बेकायदा वाळू उपशामुळे शासनाचा मोठया प्रमाणात महसूल बुडत असताना महसूल विभागाने याला रोखण्यासाठी तलाठयांची पथके तयार केली नसल्यामुळे वाळू तस्कर बिनबोभाट वाळू उपसा करीत असल्याचा बोलबाला सुरु आहे.
केवळ पोलिस प्रशासनाचे कारवाई न करता महसूल विभागानेही विविध पथके तयार करून कारवाईस हातभार लावावा अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
येथे प्रांताधिकारी व तहसीलदार असे दोन अधिकारी असतानाही या वाळू चोरीकडे साफ दुर्लक्ष असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून जिल्हाधिकार्यांनी या कामी लक्ष घालून शासनाचा महसूल वाचवावा अशी मागणी होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज