टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे, राष्ट्रवादीचे संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे आदींसह अपक्ष उमेदवारांनी केली आहे.
याचा खर्चही उचलण्यास आम्ही तयार आहोत, असेही यावेळी सांगण्यात आले. या निवडणुकीत समाधानकारक मते न मिळाल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ. भारत भालके यांच्या निधनानंतर 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होऊन 2 मे रोजी मतमोजणी झाली. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झाले.
यानंतर 4 मे रोजी शेतकरी संघटनेचे रणजित बागल, राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांनी मतमोजणीवर शंका घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले.
मात्र याची दखल न घेतल्याने 16 मे रोजी पत्रकार परिषद घेत शैला गोडसे, सचिन पाटील, तानाजी बागल, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, अॅड. घुले, रणजित बागल यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे.
पत्रकार परिषदेत मतमोजणीत आम्हाला पडलेली मते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आम्ही विजयी होणार नव्हतो पण आम्हाला पडणारी हक्काची मते कुठे गेली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रमुख दोन उमेदवारांना 2 लाख 13 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
तर उर्वरित सर्व 17 उमेदवारांना 12 हजार मते मिळाली आहेत. मतमोजणीनंतर अनेक नागरिकांचे फोन येत आहेत. आम्ही तुम्हाला मतदान दिले आहे. मात्र मतमोजणीत ही मते दिसत नाहीत. अशी मते व्यक्त केली आहेत.
स्वाभिमानीचे सचिन पाटील म्हणाले की, मला 32 लाख 68 हजार लोकवर्गणी निवडणुकीसाठी लोकांनी दिली. असे असताना केवळ 1 हजार 27 मते पडली. ही मनाला न पटणारी गोष्ट आहे.
बुथवाईज मतदानामध्ये मला पडलेली मते दिसत नाहीत. पंढरपूर शहरातील संभाजी चौकातील माझ्या नातेवाईकांची 15 ते 20 हक्काची मते असताना मतमोजणीमध्ये ही मते दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही ते म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज