मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, या दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविल्या जातात.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ९९६ आजारांवर दीड लाखांपर्यंत तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत एक हजार २०९ आजारांवर पाच लाखांपर्यंत उपचार घेता येणार आहेत.
जनआरोग्य योजनेतूनही आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची संधी देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ३५ कुटुंब पात्र असून त्यात १० लाख ४१ हजार १४६ व्यक्तींपैकी
आतापर्यंत तीन लाख ८६ हजार १८२ (३७ टक्के) जणांना ‘आयुष्यमान’चे कार्ड मिळाले आहे. उर्वरित सहा लाख ५४ हजार ९६४ लोकांनी अद्याप कार्ड घेतलेले नाही. दोन्ही योजनांअंतर्गत लाभ घेण्यासाठी रुग्णाला योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील आरोग्य मित्राला भेट घ्यावी लागते.
त्या ठिकाणी आरोग्यमित्र रुग्णाला किंवा त्यांच्या नातलगांना संपूर्ण मार्गदर्शन करतील. आजार योजनेत बसत असल्यास त्या रुग्णालयाचे वैद्यकीय समन्वयक त्या रुग्णाचे आजार योजनेअंतर्गत होण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवतात.
मंजुरीनंतर रुग्णाचे उपचार योजनेअंतर्गत मोफत होतात. २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील ४१ हजार ८७७ जणांनी तर मागील वर्षी ३१ हजार ८९९ जणांनी लाभ घेतला आहे. कोरोनाच्या काळात या दोन्ही योजना सर्वसामान्यांसाठी खूप फायदेशीर ठरल्या आहेत.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना
योजनेअंतर्गत आजार : ९९६
मोफत उपचार : दीड लाखांपर्यंत (मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपये)
लाभार्थी निकष – पिवळे, केशरी, अंत्योदय योजना, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक कुटुंबे योजनेसाठी पात्र आहेत.
लाभ घेण्यासाठी : वैध शिधापत्रिका, फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना…
योजनेअंतर्गत आजार : १२०९
मोफत उपचार : पाच लाखांपर्यंत
लाभार्थी निकष – सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेत नोंदीत पात्र ठरलेली कुटुंबे.
लाभ घेण्यासाठी : ‘आयुष्यमान’ कार्ड (ई-कार्ड).
‘आयुष्यमान’चे कार्ड काढून घ्या उपचार
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड आवश्यक आहे. ते कार्ड काढण्यासाठी लाभार्थींनी कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र किंवा योजनेतील रुग्णालयांमधील आरोग्य मित्राकडे जावे.- डॉ. रवी भोपळे, वरिष्ठ जिल्हा समन्वयक, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, सोलापूर
मंगळवेढा येथील ‘या’ रुग्णालयांमधून मिळतील मोफत उपचार
मंगळवेढा बोराळे नाका येथील मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (महिला हॉस्पिटल), शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गजानन लोकसेवा हॉस्पिटल.
न्युरो सर्जरी, न्यूरॉलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर ॲण्ड थोरॅसिक सर्जरी, पेडियाट्रिक ॲण्ड सर्जिकल मॅनेजमेंट याअंतर्गत येणाऱ्या आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या खूपच कमी आहे. यासाठी सोलापूर जिल्हा व कर्नाटक सीमेलगत असलेल्या गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी पुणे किंवा मुंबईला जाऊन महागडे उपचार घ्यावे लागतात.
राज्य आरोग्य हमी सोसायटीने सोलापूर शहरात वरील सेवा देणाऱ्या रुग्णालयांचा समावेश करणे आवश्यक आहे. तशी रुग्णालये जनआरोग्य योजनांमध्ये सहभागी झाल्यास त्या सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळू शकणार आहेत.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज